Pune : रास-गरब्यातून गुजराती समाजाच्या संस्कृतीचे दर्शन; अशोक चव्हाण यांची उपस्थिती
Pune : पुण्यात श्री पूना गुजराती बंधू समाजाची रास गरबा हरिफाई २०२६ उत्साहात पार पडली. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत विजेत्यांचा गौरव करण्यात आला.

Pune : श्री पूना गुजराती बंधू समाजाच्या वतीने आयोजित ‘रास गरबा हरिफाई २०२६’ स्पर्धा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, बिबवेवाडी येथे उत्साहपूर्ण आणि सांस्कृतिक वातावरणात पार पडली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. समाजाचे अध्यक्ष जयंत शाह आणि मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. राजेश शाह यांच्या हस्ते चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ॲड. श्रीजया अशोकराव चव्हाण, वल्लभभाई पटेल, नैनेश नंदू, राजेंद्र शाह, हरेश शाह आणि केतन कापडिया उपस्थित होते.
यावेळी बोलताना अशोक चव्हाण यांनी श्री पूना गुजराती बंधू समाजाच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, १९१३ मध्ये पुण्यात स्थापन झालेल्या या समाजाने गेल्या ११३ वर्षांत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. गुजरातमधून पुण्यात आलेल्या बांधवांनी एकत्र येऊन समाजाची स्थापना केली. आपल्या संस्कृतीचे जतन करतानाच पुण्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक जीवनात योगदान देण्याची परंपरा समाजाने कायम ठेवली आहे.
गुजराती समाजाला एकत्र आणण्याबरोबरच पुण्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनातही श्री पूना गुजराती बंधू समाजाने महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. ही अभिमानाची बाब असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
सामाजिक कार्याचा उल्लेख करताना त्यांनी जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरचेही कौतुक केले. हे केंद्र गुजराती समाजाची एकजूट, दूरदृष्टी आणि समाजासाठी काहीतरी भरीव करण्याची इच्छा दर्शवते. हे केंद्र केवळ क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीचे ठिकाण नसून विविध समाजातील नागरिकांना एकत्र आणणारे आणि नव्या पिढीला संधी देणारे महत्त्वाचे व्यासपीठ असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व मंडळांचे आणि स्पर्धकांचे त्यांनी अभिनंदन केले.
स्पर्धेत सहभागी मंडळांनी पारंपरिक गरबा नृत्य, आकर्षक वेशभूषा, तालबद्ध संगीत आणि विविध नृत्याविष्कार सादर केले. त्यांच्या सादरीकरणातून लोकपरंपरा, सांस्कृतिक वैविध्य आणि सामूहिक उत्साहाचे दर्शन घडले. त्यामुळे संपूर्ण सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
समाजाचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. राजेश शाह यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. पारंपरिक सण, उत्सव आणि सांस्कृतिक स्पर्धा समाजाला एकत्र आणण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले. अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीला संस्कृती आणि परंपरेची ओळख होते. तसेच कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळते.
‘रास गरबा हरिफाई’ ही स्पर्धा पुन्हा सुरू करून सांस्कृतिक परंपरेला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भविष्यातही अशा उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाईल, असे डॉ. शाह यांनी सांगितले.
दरम्यान, श्री पूना गुजराती बंधू समाजाच्या वतीने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीस दोन लाख एक हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली. या माध्यमातून समाजाने सामाजिक बांधिलकी जपली आहे.
जयराज ग्रुपच्या वतीने स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. प्रथम क्रमांकाच्या वैष्णवी ग्रुपला चषक आणि २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाच्या गहेक्ती गुजरातन ग्रुपला चषक आणि १५ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकाच्या नवताल ग्रुपला चषक आणि १० हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व दहा मंडळांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे विशेष पारितोषिक अशोक चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले.
कार्यक्रमाला समाजातील मान्यवर, विविध गरबा मंडळांचे प्रतिनिधी, कलाकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण अनुजा सेलोट आणि निधी मेहता यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधिका बगदाई यांनी केले.




