Satara: जिल्हा परिषदेच्या कोडोली शाळेची कामगिरी अभिमानास्पद डॉ. सौ. प्रिया शिंदे; पहिल्याच दिवशी पटसंख्या वाढली अडीचशेने
Satara पहिलीच्या सुमारे १०० मुलांची आकर्षक वेशभूशेसह रंगीबेरंगी फुग्यांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमधून झांजपथकासह ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढली.

Satara: जिल्हा परिषदेची सर्वात मोठी शाळा म्हणून कोडोली शाळेचा नावलाैकिक आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळेच याठिकाणी सर्वाधिक विद्यार्थी संख्या असून शाळेची कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे, असे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रिया शिंदे यांनी केले.
शैक्षणिक वर्षांच्या पहिल्याच दिवशी कोडोली (ता. सातारा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत प्रवेशोत्सव कार्यक्रम प्रसंगी सौ. शिंदे बोलत होत्या. पहिलीच्या सुमारे १०० मुलांची आकर्षक वेशभूशेसह रंगीबेरंगी फुग्यांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमधून झांजपथकासह ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढली. डॉ. प्रिया शिंदे यांच्या हस्ते नवीन पुस्तके, गणवेश, शूज सॉक्स, खाऊ आणि पाण्याची बाटली देऊन नवागतांचे स्वागत करण्यात आले.
शाळेच्या प्रगतीबद्दल आणि २५० पेक्षा जास्तीच्या पट वाढीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक अनिल जायकर आणि सर्व शिक्षकांचे उपाध्यक्ष राजू भोसले यांनी कौतुक केले. शाळेच्या प्रगतीसाठी सर्व प्रकारची मदत शाळेला करण्याची हमी दिली. एप्रिलमध्ये शाळेचा पट एक हजार होता तो आज शाळेच्या पहिल्याच दिवशी १२५० पेक्षा जास्त झाला. शाळेत चित्रकला छंदवर्ग, स्व- संरक्षण शिबिर, संगणक शिक्षण, रोबोटिक आणि एआयचे शिक्षण सुरु असल्याने तसेच सर्वच शिक्षकांनी मन लावून गुणवत्तापूर्ण शिक्षण दिल्यानेच शाळेचा पट सुमारे २५० ने वाढल्याचे त्यांनी नमूद केले.
यावर्षी राबवण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती गटविकास अधिकारी सुशील संसारे यांनी दिली. मुख्याध्यापक अनिल जायकर यांनी प्रास्ताविकात शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सौ. नीता खरात, बाळासाहेब खरात, पंचायत समिती सदस्य राहुल कापले, माजी सदस्य रामदास साळुंखे , शिवाजी जाधव, सरपंच सौ. स्वाती भोसले, उपसरपंच सौ. रिहाना मुलाणी, मनोज गायकवाड, विकास काटे, विक्रांत जाधव, संगीता जाधव, अधिक जाधव, दिलीप जाधव, सोमनाथ कापले, विजय क्षीरसागर, साईराज साळुंखे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. मनीषा साळुंखे, सौ. उषा जाधव, विद्यार्थी व शिक्षक, ग्राम विकास अधिकारी प्रविण पवार, स्टेम लॅबचे राज्य समन्वयक मनोज यादव, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, शिक्षणप्रेमी,ग्रामस्थ उपस्थित होते. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले. सूर्यकांत देशमुख यांनी आभार मानले.





