Satara ZP School: सातारा शैक्षणिक गुणवत्तेत कोल्हापूर विभागात ‘नंबर वन’, जिल्हा परिषदेची मोठी घोषणा
Satara ZP School: जिल्हास्तरीय सहविचार कार्यशाळेत शैक्षणिक धोरण आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांवर भर; जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांनी दिला गुणवत्तेचा मंत्र.

Satara ZP School – विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व शाळांच्या प्रगतीसाठी आणि गुणवत्तावाढीसाठी जिल्हा परिषद कटिबद्ध आहे, जिल्ह्याने कोल्हापूर विभागात शैक्षणिक गुणवत्तेबाबतीत अव्वल स्थान मिळवले आहे, अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रिया शिंदे यांनी दिली. माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने प्राचार्य व मुख्याध्यापक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांच्या जिल्हास्तरीय सहविचार कार्यशाळेत डॉ. प्रिया शिंदे बोलत होत्या.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले, माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, जिल्हा परिषद सदस्य अजित साळुंखे यावेळी उपस्थित होते. माध्यमिक विभागाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉ. शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. मुख्याध्यापकांच्या विविध शंका व समस्यांचे निरसन राजू भोसले यांनी केले. विद्यार्थी आणि शाळांच्या विकासासाठी जिल्हा परिषदेमार्फत आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
‘शैक्षणिक गुणवत्तेबाबतीत सातारा जिल्हा महाराष्ट्रात अग्रस्थानी राहण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे,’” असे धनंजय चोपडे यांनी समारोपप्रसंगी सांगितले. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वृद्धिंगत करणे, नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे, शाळांचा सर्वांगीण विकास साधणे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेस सैनिक स्कूलचे प्राचार्य रामनाथन, कोल्हापूर शिक्षण संघटनेचे विभागीय अध्यक्ष आर. वाय. जाधव, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव,
महाराष्ट्र मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष सचिन नलवडे, जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय संघटनेचे अध्यक्ष विलास खंडाईत उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रशस्तीपत्रे देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. पवित्र पोर्टल शिक्षक भरती, संचमान्यता, कुणबी नोंदणीसंदर्भातील कार्यवाही, विनाअनुदानित ते अनुदानित शाळांच्या प्रक्रियेसंदर्भातील प्रशिक्षण, शाळा प्रवेशोत्सव,
नशामुक्त भारत अभियान, विद्यार्थी सुरक्षा अभियान, आंतरराष्ट्रीय योग दिन, आनंददायी शनिवार उपक्रम तसेच एकल पालक विद्यार्थ्यांच्या बाबी यांवर मार्गदर्शन करण्यात आले. उपशिक्षणाधिकारी तेजस गंबरे, शिवाजी मलदोडे, दत्तात्रय गिरी यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. भरत मोझर यांनी सूत्रसंचालन केले. संजय यादव यांनी आभार मानले.





