पुणे – गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य आरोपी मुन्नाने खून केल्यावर मोबाईलमध्ये एक एक नवीन सिम कार्ड टाकले आणि पहिला फोन संतोष कुरपेला करून सांगितले की, शरद मोहोळचा गेम केला असून ही गोष्ट मास्टर माईंडला सांगा. यामुळे मास्टर माईंड कोण, याचा शोध गुन्हे शाखा शोेध घेत आहे. दरम्यान एका टोळीच्या कुख्यात गुंडाकडे संशयाची सुई वळली आहे. हा गुंडही जामिनावर बाहेर असून जमिनीचे व्यवहार आणि राजकीय पक्षात सक्रिय आहे.
या प्रकरणात नव्याने नितीन अनंता खैरे (३४, रा. गादी स्टेट, कोथरूड), आदित्य विजय गोळे (२४) आणि संतोष दामोदर कुरपे (रा. कोथरूड) यांना अटक झाली आहे. संतोष कुरपे हे ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) या केंद्र सरकारच्या संस्थेत ऑफिस असिस्टंट या पदावर आहेत. आतापर्यंत या प्रकरणात १३ जणांना अटक करण्यात आली आहे. तर दोन वकील आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
यावेळी तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात सांगितले की, मोहोळचा खून करण्यापूर्वी मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी हडशी गावात गोळीबाराचा सराव केला होता. त्यावेळी आरोपी नितीन खैरे आणि आदित्य गोळे हे सहभागी झाले होते. तसेच खैरे आणि गोळे यांनी आरोपीला शस्त्र खरेदीसाठी आर्थिक मदत केली आहे. तसेच खुनाच्या कटात त्याचा सहभाग आहे. त्याने इतर आरोपींकडून तयारी करून घेतली.
खैरे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तसेच मोहोळचा खून होण्यापूर्वी आरोपींची मिटिंग झाली होती त्याला आरोपी आदित्य गोळे उपस्थित होता. मोहोळचा खून केल्यानंतर मुन्ना पोळेकरसह इतर आरोपी हे कोल्हापूरच्या दिशेने पळून जात होते. यावेळी खेड शिवापूर टोल नाक्याच्या पुढे हे आरोपी थांबले. त्यावेळी आरोपींना त्यांचे नातेवाईक भेटायला आले होते. त्यावेळी आरोपीला एक नवीन सिम कार्ड देण्यात आले. आरोपीने पहिले सिमकार्ड काढून नवीन सिम कार्ड मोबाईलमध्ये टाकले आणि पहिला फोन संतोष कुरपेला करून, शरद मोहोळचा गेम केला असून ही गोष्ट मास्टर माईंडला सांगा, असे सांगितले होते.
मोहोळचा खून करण्यासाठी ४ पिस्तूल आणण्यात आले होते. त्यातील ३ पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. यातील १ पिस्तूल संदर्भातील माहिती खैरे आणि गोळे याला आहे. हडशी येथे गोळीबाराचा सराव केला होता. त्यावेळी अजून काही आरोपी उपस्थित होते. मुन्ना पोळेकर आणि इतर आरोपीचा सोबत तपास करायचा असल्याने ५ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी तांबे यांनी केली होती. त्याला विरोध करतांना आरोपीच्या वतीने लोक अभिरक्षक कार्यालयाच्या वतीने मयूर दोडके यांनी बाजू मांडली.
यावेळी अॅड दोडके यांनी न्यायालयात सांगितले की, संतोष कुरपे यांना अनोळखी क्रमांकावरून फोन आल्याने उचलला. पलीकडून शरद मोहोळचा गेलं केला असून मास्टरला सांगा, असे सांगितले. तसेच पोलिसांनी चौकशीसाठी ११ जानेवारीला बोलावले होते. त्यावेळी माहिती दिल्याने कमीत कमी पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आरोपीना १७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.