Pune | ‘लाडक्या बहिणी’ला भररस्त्यात लुटले

पुणे – राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा काही भामट्यांनीही घेतला आहे. आजवर बोगस अर्ज भरुन पैसे लाटल्याच्या घटना समोर आल्या होत्या. आता मात्र प्रत्यक्षात पैसे मिळवून देतो, असे सांगत भामटे भररस्त्यात महिलांना लुटत आहेत. अशाच एका घटनेत एका ७० वर्षांच्या महिलेचे ८० हजारांचे दागिने पळवण्यात आले. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या भामट्यांपासून सावध रहाण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. माणिकबाई रायकर (७०, रा. हडपसर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला स्वस्त धान्य दुकानातून कुपन घेऊन घरी चालल्या होत्या. यावेळी एक व्यक्ती त्यांच्याजवळ आला, त्याने “चला मावशी येथे एक साहेब लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटत आहे,’ असे सांगत वृद्धेला कर्मवीर भाऊसाहेब चौकात आणले.
तेथे एके ठिकाणी बसवून “येथे बसा. साहेब पाच हजार घेऊन येतील’ असे सांगितले. यानंतर आरोपी तेथून निघून गेला. वृद्ध महिला बराच वेळ वाट पाहून घरी निघून आल्या. घरी आल्यावर त्यांच्या लक्षात आले, की त्यांचे मंगळसूत्र आणि अंगठी कोणीतरी काढून घेतली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार दीपक कांबळे करत आहेत.
पोलीस असल्याचे सांगत दागिने लांबवले
पोलीस असल्याचे सांगतरस्त्यावर किरकोळ वस्तूंची विक्री करणाऱ्याला भामट्याने लुटले. तुळशीबाग-मंडई रस्त्यावर ही घटना घडली. या प्रकरणी काळुराम वाडकर (५५, रा.फुरसुंगी) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. काळुराम हे वाहनातून वस्तू उतरवत होते.
तेव्हा पोलीस असल्याचा बहाणा करुन एक भामटा तेथे आला. त्याने रस्त्यावरील लोकांचे दागिने लुटले जात आहेत, गळ्यातील चेनस्कुटरच्या डिक्कीत ठेवा असे सांगितले. त्यावर काळुराम यांनी सोन्याची चेन आणि अंगठी एका बटव्यात घालून पिशवीत ठेवली . यानंतर भामट्याने ते दागिने नीट ठेवली आहे का? हे पाहण्याचा बहाणा करत ती काढून घेतली. तपास पोलीस उपनिरीक्षक नरवडे करत आहेत.





