Pune : टीईटी घोटाळेबाजांचा नोकरीसाठी खटाटोप

पुणे – राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) घोटाळ्यातील उमेदवारांनी पवित्र पोर्टलमार्फत होत असलेल्या शिक्षक भरतीच्या माध्यमातून नोकरी मिळविण्याचा घाट घातला असल्याचे आढळून येत आहे. घोटाळ्यातील उमेदवारांना नोकरी मिळत असल्याने प्रामाणिकपणे परीक्षा दिलेल्या उमेदवारांवर अन्याय होत असल्याच्या संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.
शिक्षकांची नोकरी मिळविण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा व शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. सन २०१२ नंतर सेवेत लागलेल्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याची सक्ती करण्यात आली होती. मात्र, बहुसंख्य जणांना परीक्षेत यश मिळालेच नव्हते.
सन २०१८ ते २०२० या कालावधीत झालेल्या टीईटी परीक्षांमध्ये सुमारे आठ हजार उमेदवारांनी गैरव्यवहार केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. परीक्षेत नापास झालेल्या उमेदवारांनी आर्थिक व्यवहार करून परीक्षेच्या निकालात फेरफार करून गुण वाढवून घेतले होते. काही उमेदवारांनी टीईटी प्रमाणपत्र बोगस प्राप्त करून घेतले होते. पोलिसांकडून संबंधितावर गुन्हेही दाखल करण्यात आले होते.
घोटाळ्यातील उमेदवारांना आगामी परीक्षांना बसण्यास बंदी घालण्यात आली होती. नोकरीत असलेल्या शिक्षकांना सेवेतून काढून टाकण्याची कारवाई केली होती. मात्र, काही जणांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन कारवाईला स्थगिती मिळविली. काही उमेदवारांनी गुन्हे सिद्ध झाले नसल्याचा कांगावा करत पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठीच्या प्रक्रियेत सहभाग घेत नियुक्त्या मिळविण्याचा खटाटोप सुरू ठेवला आहे.
सध्या याबाबत सुमारे ३० प्रकरणे उघडकीस आली आहेत. राज्यातील पुणे, सोलापूर जिल्हा परिषदांसह अन्य जिल्ह्यांतही काही उमेदवारांनी नियुक्त्या मिळविल्याचे प्रकार घडल्याची चर्चा रंगू लागली आहे. अधिकाऱ्यांनी घोटाळ्यातील उमेदवारांच्या नियुक्तीस तीव्र विरोधही दर्शविला. मात्र, तो न जुमानता त्यांना घाईघाईने नियुक्त्या देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
महापालिकेचे शिक्षण विभागाला पत्र
पवित्र पोर्टलद्वारे पुणे महापालिकेच्या शाळांत घोटाळ्यातील आठ शिक्षकांची निवड झाली आहे. मात्र, महापालिकेने अद्याप या शिक्षकांना रुजू करून घेतलेले नाही. महापालिकेने शालेय शिक्षण विभागाला पत्र पाठवून मार्गदर्शन मागविले आहे. शालेय शिक्षण विभागाने शासनाकडे योग्य त्या निर्देशासाठी पत्रही पाठविले आहे.





