Pune Temperature : पुण्यात उष्णतेचा ‘हाय अलर्ट’! दुपारी १२ ते ४ बाहेर पडताय? तर आधी ही बातमी वाचा
Pune Temperature : लोहगावमध्ये ४२.७ अंश सेल्सिअससह हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद; शिवाजीनगर आणि दौंडमध्येही पारा ४१ अंशांच्या पार.

Pune Temperature – शहरासह जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी उष्णतेचा पारा अर्धा ते एक अंशाने वाढला. परिणामी कमाल तापमान ४३ अंशाच्या दिशेने वाटचाल करत असून, सुर्यनारायण कोपल्याने पुणेकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. रविवारी जिल्ह्यातील उष्णतेचा पाराही ४१ अंशाच्या पुढे नोंदविल्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला असून, नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
पुणे जिल्ह्यात उष्णतेची लाट दिवसेंदिवस तीव्र होत असून, ३९ ते ४२ अंशाच्या जवळपास असलेला उष्णतेचा पारा अर्धा ते एक अंशाने वाढला आहे. लोहगावला सर्वाधिक ४२.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली असून, ती हंगामातील उच्चांकी नोंद आहे. शिवाजीनगर, दौंड, बारामती, तळेगाव दाभाडे, वडगावशेरी, चिंचवडलाही ३९ ते ४० अंशावरील पारा आज ४१ अंशाच्या पुढे गेला. त्यामुळे आज सकाळपासूनच उन्हाच्या तीव्र झळा जाणवत होत्या.
दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हाचा तडाखा असह्य होता. उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांना दुपारी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये. जास्तीत जास्त पाणी पिणे, सुती कपडे वापरणे, डोक्याला रुमाल- टोपीचा वापर करणे अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून पाऊस हुलकावणी देत असून, उन्हाचा चटका, उकाड्याने पुणेकर हैराण झाले आहेत. पुढील २४ तासात शहरातील हवामान कोरडे राहील. दिवसभर उन्हाचा चटका जाणवेल. दुपारनंतर ढगाळ वातावरण, मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे.
रविवारचे तापमान
लोहगाव ४२.७, शिवाजीनगर ४१.८, दौंड ४१.५, बारामती ४१.४, तळेगाव दाभाडे ४१.३, वडगावशेरी आणि चिंचवड ४१.२, मगरपट्टा ४०.९, गिरीवन ४०.८, हडपसर ४०.३, हवेली ४०.२, पाषाण ४०.१, एनडीए ३९.३ अंश सेल्सिअस





