Manchar : कर्जत तालुक्यातील पर्यावरणप्रेमी आक्रमक
Manchar : संजय पवळे यांच्यासमवेत आलेल्या पर्यावरणप्रेमी आणि वृक्षप्रेमींनीही वृक्षतोडीचा निषेध केला. जंगलातील मौल्यवान वृक्षसंपदा नष्ट झाल्यास त्याचा परिणाम वन्यजीव, जैवविविधता,पाण्याचे स्रोत आणि पर्यावरणावर होणार असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.

मंचर : भीमाशंकर जंगल अभयारण्या जवळ कर्जत तालुक्यातील परिसरात सुरू असलेल्या वृक्षतोडीला विरोध दर्शविण्यासाठी आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सदस्य आणि वृक्षप्रेमी संजय पवळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी जंगलातील वृक्षांची होत असलेली तोड पाहून तीव्र संताप व्यक्त केला. पर्यावरणाचे संतुलन राखण्यात जंगल आणि वृक्षांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र,मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याने निसर्गाची हानी होत असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
संजय पवळे यांच्यासमवेत आलेल्या पर्यावरणप्रेमी आणि वृक्षप्रेमींनीही वृक्षतोडीचा निषेध केला. जंगलातील मौल्यवान वृक्षसंपदा नष्ट झाल्यास त्याचा परिणाम वन्यजीव, जैवविविधता,पाण्याचे स्रोत आणि पर्यावरणावर होणार असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. वृक्षतोड तातडीने थांबवून जंगलाचे संरक्षण करावे,अशी मागणी यावेळी करण्यात आली.पर्यावरणाच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन या वृक्षतोडीविरोधात आवाज उठविण्याचा निर्धारही उपस्थितांनी व्यक्त केला.
भीमाशंकर जंगलातील वृक्षतोड ही पर्यावरणाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. जंगल वाचले तरच निसर्गाचे संतुलन टिकेल. वृक्षतोड तातडीने थांबवून वनसंपदेचे संरक्षण करण्यासाठी आम्ही सर्व पर्यावरणप्रेमी एकजुटीने लढा देणार आहोत.
-संजय पवळे,सदस्य, आंबेगाव तालुका पंचायत समिती.





