Pune District : रंगांच्या माध्यमातून उजनी बचावचा संदेश
Pune District : उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाणी सोडल्यानंतर परिसरातील पिंपरी, नरसिंहपुर येथील शेतकऱ्यांना नेहमीच दिलासा मिळतो. यामुळे त्या भागातील ही शेतकऱ्यांनी उजनी बचावच्या पवित्रा घेतला आहे.

वडापुरी : उजनी धरण आणि भीमा नदीच्या संरक्षणासाठी सध्या परिसरात जनजागृती आणि आंदोलनाची लाट निर्माण होत असताना, इंदापूर तालुक्यातील पिंपरी येथील शितल विजय बोडके यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून ‘उजनी बचाव’ ही संकल्पना रांगोळीतून प्रभावीपणे साकारली आहे.
उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाणी सोडल्यानंतर परिसरातील पिंपरी, नरसिंहपुर येथील शेतकऱ्यांना नेहमीच दिलासा मिळतो. यामुळे त्या भागातील ही शेतकऱ्यांनी उजनी बचावच्या पवित्रा घेतला आहे.
यामुळेच शितल बोडके यांनी रांगोळीच्या रंगांमधून उजनी धरणाच्या संरक्षणाचा आणि पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या उजनी धरण परिसरात प्रस्तावित औद्योगिक प्रकल्प, एआय डेटा सेंटर आणि अन्य प्रकल्पांमुळे पाणी, शेती, पर्यावरण तसेच स्थानिक नागरिकांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर शितल बोडके यांनी रांगोळीच्या माध्यमातून मांडलेली ‘उजनी बचाव’ ही संकल्पना विशेष लक्षवेधी ठरत आहे. केवळ आंदोलन आणि घोषणांमधूनच नव्हे, तर कला, संस्कृती आणि सामाजिक जनजागृतीच्या माध्यमातूनही पर्यावरणाच्या प्रश्नांना वाचा फोडता येते, हे त्यांनी आपल्या कलाकृतीतून दाखवून दिले आहे.
उजनीचे सरक्षंण ही सामुहिक जबाबदारी
उजनी धरण हे लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे, शेतीचे आणि परिसराच्या अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे आधारस्थान आहे. त्यामुळे उजनीचे पाणी, पर्यावरण आणि नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे, असा संदेश या रांगोळीच्या माध्यमातून अधोरेखित होत आहे. शितल बोडके यांच्या या कलात्मक उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत असून, त्यांच्या रांगोळीने ‘उजनी बचाव’ चळवळीला कलेच्या माध्यमातून एक वेगळी दिशा दिली आहे.





