Pune Temperature : पुणे ‘हॉट’ सिटी! लोहगावला विक्रमी ४२.४ अंश तापमान; सर्वात मोठा रेकॉर्ड मोडला
Pune Temperature : पुण्यात उन्हाचा तडाखा वाढला; लोहगावात शनिवारी विक्रमी ४२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर शिवाजीनगरचा पारा ४१ अंशावर.

Pune Temperature – शहरात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून, शनिवारी (दि. २५) तापमानाने यंदाचा उच्चांक गाठला आहे. उष्णतेचा पारा ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने पुणेकरांना उन्हाच्या झळांनी नकोसे केले आहे.आज लोहगाव परिसरात सर्वाधिक ४२.४ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. शिवाजीनगर परिसरातील पाराही ४१ अंशावर पोहचला.
गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. सकाळी १० वाजल्यापासूनच सूर्याचे चटके जाणवू लागतात, तर दुपारच्या वेळी उन्हाच्या झळा अंगाची लाहीलाही करत आहेत. रस्त्यांवरून चालताना उष्ण वारे थेट तोंडाला लागत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.
केवळ लोहगावच नव्हे तर शिवाजीनगर, पाषाण, चिंचवड, कोरेगाव पार्क, हडपसर आणि मगरपट्टा या भागांतही कमाल तापमानात मोठी वाढ नोंदवली आहे. वाढत्या तापमानासोबतच उकाडाही कमालीचा वाढला असून, पुणेकर घामाघुम झाले आहेत. दुपारच्या सत्रात शहरातील मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
या वाढत्या तापमानावर सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस दिलासा देईल असे वाटत होते. मात्र, पावसाने हुलकावणी दिली. पुढील काही दिवस उष्णतेची ही लाट कायम राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली असून, नागरिकांनी दुपारच्या वेळी शक्यतो बाहेर पडणे टाळावे आणि जास्तीत जास्त पाणी प्यावे, असे आवाहन केले आहे.
शनिवारचे तापमान
लोहगाव ४२.४, शिवाजीनगर ४१, वडगावशेरी ४०.७, चिंचवड ४०.५, बारामती ४०.१, गिरीवन ३९.९, हवेली ३९.७, हडपसर ३९.६, पाषाण ३९.२, एनडीए ३८.७ अंश सेल्सिअस.




