Pune District : वयाच्या ७४ व्या वर्षी फुलविली टोमॅटोची बाग
Pune District : कानडे यांनी टोमॅटो लागवडीपूर्वी शेताची नांगरणी करून शेणखत व अन्य खतांचा वापर करत गादीवाफे तयार केले. त्यानंतर जुलै महिन्यात आर्यमान जातीच्या २० हजार रोपांची लागवड केली. ठिबक सिंचनाद्वारे वेळोवेळी खते दिल्याने पिकाची चांगली वाढ झाली.

मंचर : कळंब (ता.आंबेगाव) येथील शकुंतला बबनराव कानडे यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी दुष्काळी परिस्थितीवर मात करत खडकाळ माळरानावर टोमॅटोची बाग फुलविली आहे. मल्चिंग पेपर आणि ठिंबक सिंचनाचा वापर करून त्यांनी तीन एकर १५ गुंठे क्षेत्रात टोमॅटोचे आतापर्यंत सात हजार कॅरेट उत्पादन घेतले आहे. आणखी तीन हजार कॅरेट उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र,सध्या घसरलेल्या बाजारभावामुळे उत्पादन खर्च आणि मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळ बसत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
कानडे यांनी टोमॅटो लागवडीपूर्वी शेताची नांगरणी करून शेणखत व अन्य खतांचा वापर करत गादीवाफे तयार केले. त्यानंतर जुलै महिन्यात आर्यमान जातीच्या २० हजार रोपांची लागवड केली. ठिबक सिंचनाद्वारे वेळोवेळी खते दिल्याने पिकाची चांगली वाढ झाली. लागवडीनंतर दीड महिन्याने झाडांची वाढ व्यवस्थित व्हावी आणि फळांचा जमिनीशी संपर्क येऊ नये, यासाठी सुतळीच्या साहाय्याने झाडे तारेला बांधून ताठ ठेवली.
रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आणि करपा रोगाचा धोका टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक औषधांची फवारणीही केली.ऑक्टोबर महिन्यात टोमॅटो काढणीला सुरुवात झाली. नारायणगाव येथील बाजार समितीच्या टोमॅटो बाजारात मालाची विक्री केली जात आहे. या शेतीतून पंचक्रोशीतील सुमारे २० जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. कानडे यांनी यापूर्वीही द्राक्ष, झेंडू आणि टोमॅटो अशी विविध पिके घेतली आहेत. त्यांच्या शेतात उसाचे एकरी ११० टन उत्पादन झाल्याबद्दल भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने नुकताच त्यांचा गौरव केला आहे.
वाढत्या तापमानातही काटेकोर नियोजन
पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रमोद कानडे म्हणाले, “आईने दुष्काळी परिस्थिती आणि वाढत्या तापमानातही टोमॅटो पिकाचे काटेकोर व्यवस्थापन केले. सुरुवातीला टोमॅटोला कॅरेटमागे ३०० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. मात्र, सध्या १०० ते १५० रुपये प्रतिकॅरेट दर मिळत आहे. उत्पादनासाठी झालेला खर्च आणि मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.टोमॅटोच्या बाजारभावात वाढ होणे गरजेचे आहे.”





