पुणे- मागील काही दिवसांपासून सातत्याने शिवसेनेवर आरोपांची राळ उठवणारे भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांच्या रोषाला शनिवारी सामोरे जावे लागले. पुणे महापालिकेत आल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. किरीट सोमय्या यांना खाली पाडल्यानंतरही काही संतप्त शिवसैनिकांनी त्यांना मारहाण करण्यास सुरवात केली. अखेरीस पोलीस आणि त्यांच्या सुरक्षेवर असणाऱ्या कमांडोंनी त्यांना सुरक्षीत मोटारीत नेऊन बसवले.
मात्र शिवसैनिकांनी मोटार अडवत त्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अखेरीस पोलिसांनी कसेबसे त्यांना पालिकेबाहेर काढले. तेथून त्यांना थेट संचेती रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. किरीट सोमय्या यांच्या हाताला प्लास्टर बसवण्यात आले असून त्यांच्या माकड हाडाला दुखापत झाल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, शिवसेनेच्यावतीने परिवहनमंत्री अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, शिवसैनिक आक्रमक असतात हे कधी ना कधीतरी घडणारच होते.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याची प्रक्रिया सायंकाळनंतर सुरू केली होती. किरीट सोमय्या यांनी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पुण्यातील जम्बो कोविड सेंटर घोटाळ्यातील खा. संजय राऊत यांचे भागीदार सुजीत पाटकर यांच्या लाईफलाइन हॉस्पिटल व्यवस्थापनाविरुध्द तक्रार दाखल केली.
त्यानंतर पोलीस ठाण्याच्या आवारातच त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी पत्रकार परिषदेत पाटकर यांनी बनावट कंपनी बनवून कोविड सेंटरचे कंत्राट मिळवल्याचे सांगितले. तसेच 100 कोटींचा कोविड सेंटर घोटाळा केल्याचा आरोप केला. यानंतर ते महापालिका आयुक्तांकडे याची तक्रार दाखल करण्यासाठी महापालिकेत दाखल झाले. त्यांच्या समवेत त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील कमांडो होते.
निवडक भाजपा कार्यकर्ते आणि पोलिसांचा ताफा सोबत होता. त्यांनी पालिकेच्या नवीन इमारतीच्या प्रवेशद्वारात पाऊल ठेवताच काही आक्रमक शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. त्यांनी पुणे महापालिकेतील भ्रष्टाचारही बाहेर काढा, अशी मागणी सोमय्या यांच्याकडे केली. यावेळी “मला निवेदन द्या, मी स्वीकारतो’ असे सोमय्या यांनी सांगितले. त्या शिवसैनिकाशी संवाद साधत असतानाच अन्य आक्रमक शिवसैनिक आणि महिला कार्यकर्त्या घोषणाबाजी करत त्यांच्या अंगावर धाऊन आल्या. एका कार्यकर्त्याने स्वत:चा काळा शर्ट काढून त्यांना दाखवत त्यांचा निषेध सुरू केला. त्यावेळी मागील बाजूने आलेल्या काही शिवसैनिकांनी त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न सुरू केला. यातून ढकलाढकली सुरू झाली.
त्यातच काही जणांनी धक्काबुक्की करत त्यांना प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवर अक्षरश: पाडले. कमांडो आणि पोलिसांनी कार्यकर्त्यांना कसेबसे आवरत सोमय्यांना उचलले. यानंतर त्यांना थेट वाहनात बसवले. मात्र, आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी वाहनांच्या दिशेने धाव घेतली. गाडीवर लाथाबुक्क्या मारत त्यांनी सोमय्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. पोलिसांनी गाडी कशीबशी हलवली, मात्र बाहेर पडणाऱ्या फाटकाजवळ त्यांची गाडी शिवसैनिकांनी पुन्हा अडवली. तेथे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मात्र त्यांचे कमांडो आणि पोलिसांनी आंदोलकांना दटावत आणि अक्षरश: उचलून बाजूला नेत त्यांचे वाहन पालिकेतून बाहेर काढले.
तेथून थेट संचेती रुग्णालयात नेण्यात आले. शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, युवा सेना सहसचिव किरण साळी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर घोषणाबाजी करत आंदोलनाचे समर्थन केले. संजय मोरे यांनी सोमय्या यांनी पालिकेतील भ्रष्टाचाराबद्दल बोलावे. त्या संदर्भात आम्ही आंदोलन करून त्यांना निवेदन देण्यासाठी आल्याचे सांगितले. दरम्यान शर्ट काढून सोमय्या यांचा निषेध करणाऱ्या एका कार्यकर्त्यास पोलिसांनी घटनास्थळारून ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी महापालिकेतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले.
हल्ला केला म्हणून किरीट सोमय्या स्वस्थ बसणार नाहीत, भारतीय जनता पार्टी कायदेशीर पद्धतीने जशास तसे उत्तर देईल सभ्यतेचा पांघरलेला बुरखा आता फाटला असून सर्व ठिकाणी राज्यातील सत्ताधाऱ्यांचा मूळ चेहरा दिसू लागला आहे. मुद्दे संपल्यामुळे ते गुद्द्यांवर आले आहेत. आजच्या शिवसैनिकांच्या हल्ल्यांमुळेही सोमय्या घाबरून गप्प बसणार नाहीत. आमचा कायद्यावर विश्वास आहे आणि आम्ही कायदेशीरपणेच उत्तर देऊ. पण जशास तसे उत्तर दिले जाईल.
– चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजपा
—————
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे शिवसेनेतील बडया नेत्याच्या पुण्यातील भ्रष्टाराची तक्रार करण्यासाठी आले होते. यावेळी शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर भ्याड हल्ला केला असून हा हल्ला नियोजबध्द होता. त्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी. शहराच्या इतिहातील हा काळा दिवस असून या घटनेनंतर भाजप शांत बसणार नाही. या घटनेचा आम्ही निषेध करतो.
– जगदिश मुळीक, शहराध्यक्ष, भाजपा
माकड हाडाला दुखापत
सोमय्यांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी संचेती रुग्णालयात त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली. ते म्हणाले, त्यांना दाखल केले त्यावेळी त्यांचा रक्तदाब खूप वाढला होता. मात्र उपचारानंतर तो स्थिरावला आहे. त्यांच्या हाताला प्लास्टर करण्यात आले आहे. त्यांच्या माकड हाडाला दुखापत झाली आहे. त्यांना एक दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येऊन कदाचित उद्या डिस्चार्ज देण्यात येईल.
सीसीटीव्ही फुटेजवरून तपास
या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. सीसीटीव्ही फुटेज घेऊन आम्ही तपास सुरू केला आहे. हल्ला करणाऱ्या कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही. सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे आरोपी निश्चितपणे निष्पन्न होतील. अशी माहिती पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली.