दोन दिवसांत टाकीतून नागरिकांना पुरेसा दाबाने पाणी मिळणार- माजी नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे
हडपसर : रामटेकडी ते सेलेना पार्क दरम्यानच्या अडीच किलोमीटर अंतराच्या पाण्याच्या मुख्य लाईनचे काम शुक्रवारी पूर्ण झाले. त्यानंतर शनिवारी दुपारी माजी नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे व महापालिका कर्मचारी यांनी रामटेकडी येथील मुख्य जलवाहिनीचा वॉल्व्ह सोडला तेव्हा काही वेळातच विना अडथळा पाणी सेलेना पार्क येथील पाण्याच्या टाकीत पोहचले.
आता मुख्य व अंतर्गत जलवाहिन्या स्वच्छ धुवून घेऊन पुढील दोन दिवसांत याभागातील नागरिकांना वेळेत आणि पूर्ण दाबाने पाणी मिळेल,अशी माहिती माजी नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांनी दिली.काळेपडळ आणि हांडेवाडी परिसरातील सर्व नागरिकांना वेळेत आणि पुरेसा दाबाने पाणी मिळावे यासाठी गेली अडीच वर्षे शासन, महापालिका आणि संबधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळेच मागील काळात रखडलेला हा प्रकल्प पूर्ण होवून आज नागरिकांना पाणी मिळत आहे. असा दावा माजी नगरसेवक भानगिरे यांनी केला आहे. दरम्यान मुख्य जलवाहिनीची टेस्टिंग झाली असून अंतर्गत जलवाहिन्या स्वच्छ करून घेण्यात येतील. त्यानंतर पाणी सोडण्याचे नियोजन करून पाणी सोडण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शनिवारी ( दि.१६) दुपारी रामटेकडी येथील मुख्य टाकीतून सेलेना पार्क टाकीकडे जाणाऱ्या पाण्याच्या लाईनचा वॉल्व्ह सोडण्यात आला. गेली अनेक वर्षे काळेपडळ व हांडेवाडी रोड परिसरातील नागरिकांना खास करून महिला भगिनी पाण्याची वाट पाहत होते. ती प्रतीक्षा आता संपली आहे.याशिवाय सोसायटी यांना घ्यावे लागणारे पाण्याचे टॅंकर बंद होतील.याचा मोठा आनंद होतो आहे. सेलेना पार्क टाकीचाही वॉल्व्ह सुरू केला आहे.पुढील दोन दिवसांत सर्व नागरिकांना वेळेत व पुरेसा पाणी पुरवठा होणार आहे. प्रत्यक्ष कामाला सहा महिने लागणार होते, परंतु स्वतः रात्रंदिवस थांबून हे काम एक ते दीड महिन्यात पूर्ण करून घेतले. यासाठी महापालिका अधिकारी, प्रशासन, ठेकेदार, वाहतूक प्रशासन यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यांचे धन्यवाद.
प्रमोदनाना भानगिरे, माजी नगरसेवक,शिवसेना