पुणे – राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे पुण्यात झालेल्या अनुवाद कार्यशाळेतून तयार झालेल्या ३३ पुस्तकांचे प्रकाशन मंगळवारी पुणे पुस्तक महोत्सवात झाले. यात हिंदी, इंग्रजी या भाषांतील पुस्तकांचा मराठीमध्ये अनुवाद करण्यात आला आहे. या प्रकाशन कार्यक्रमाला साहित्य अकादमीचे सदस्य नरेंद्र पाठक, ज्येष्ठ बालसाहित्यिका डॉ. संगीता बर्वे, ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील, ज्येष्ठ अनुवादक रवींद्र गुर्जर, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे संचालक युवराज मलिक, आनंद काटीकर या वेळी उपस्थित होते.
अनुवाद कार्यशाळा या पुणे पुस्तक महोत्सवाचे बीज होती. भाषा आणि संस्कृतीला वेगळे करता येत नाही. मानव संवाद करू शकतो म्हणून माणूस श्रेष्ठ आहे. संस्कृतीचे वाहक म्हणून वाचकांनी करायचे आहे. बालसाहित्य समाजाची संरचना करते. त्यामुळे सकस बालसाहित्याची निर्मिती अत्यावश्यक आहे, असे युवराज मलिक यांनी सांगितले.
साहित्य संमेलनाप्रमाणेच अतिशय नेटका पुस्तकांचा महोत्सव पुण्यात झाला आहे. अनुवाद व्यापक संकल्पना आहे. अनुवादाची फार प्राचीन परंपरा आहे. ललित पुस्तकांचा मराठीमध्ये अनुवाद ७०च्या दशकात सुरू झाला. गेल्या पन्नास वर्षांत अनुवादक म्हणून पॅपिलॉनसह अनेक पुस्तकांचा अनुवाद करता आला. सुरुवातीला अनुवादित साहित्य गौण समजले जायचे, पण आता अनुवादित साहित्याला प्रतिष्ठा मिळाली. अनुवाद ही स्वतंत्र कला आहे हे अधोरेखित झाले, असे रवींद्र गुर्जर म्हणाले.
लहान मुलांसाठी एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात पुस्तके प्रकाशित होणे दुर्मीळ आहे. मुलांसाठी सोपे, सुटसुटीत लिहावे लागते, पुस्तके आकर्षक असावी लागतात. मुलांच्या पुस्तकांसाठी खूप विचार करावा लागतो. मुलांनी वाचण्यासाठी खूप प्रयत्न करण्याची गरज आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यास ते काम करत आहे हे महत्त्वाचे आहे, असे मनोगत डॉ. संगीता बर्वे यांनी व्यक्त केले.
छत्रपती शिवरायांचा मार्ग योग्य
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर देशाचे राष्ट्रपुरुष होते. त्यामुळे आपल्याला सामर्थ्यवान भारत घडवायचा असल्यास, छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या मार्गावरून चालण्याशिवाय पर्याय नाही, असे मत इतिहासकार मोहन शेटे यांनी व्यक्त केले. या महोत्सवात शेटे यांनी शिवरायांची गाथा हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमात भारतीय विचार साधना प्रकाशनाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील लहान मुलांसाठी सहा पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.