Pune News : आरटीओची सेवा आता फेसलेस ; पसंतीचा क्रमांक मिळवा घरबसल्या

प्रभात वृत्तसेवा
पुणे – प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाकडून नवीन वाहनांसाठी पसंतीचे, आकर्षक नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची व्यवस्था आता ऑनलाइन व फेसलेस केली आहे. सेवा २५ नोव्हेंबरपासून कार्यान्वित होणार असून त्यासाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. नवीन मालिका एमएच १२ वायआर मधील पसंतीचे नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची सेवा १ ऑक्टोबरपासून सुरु झाली असून कार्यालयात कोणतेही ऑफलाइन शुल्क स्वीकारले जात नाही.
अर्जदाराने परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून ओटीपीच्या साहाय्याने लॉगिन करावे. पसंतीचा क्रमांक निवडावा आणि एसबीआई ई-पे गेटवेच्या माध्यमातून ऑनलाईन शुल्क भरावे. त्यानंतर ई-रिसीट प्रिंट करून संबंधित वाहन विक्रेत्याकडे सादर करावी. ही सोय वैयक्तिक मालकीच्या वाहनांसाठी उपलब्ध असून इतर प्रकारच्या (कंपनी, संस्था) वाहनांसाठी पसंती क्रमांक कार्यालयातच जारी होतील.





