Pune Metro: पिंपरी-स्वारगेट मार्गावर मेट्रोचा चक्का जाम! वीज जाताच ८ गाड्या फलाटावर अडकल्या; प्रवाशांचे हाल
Pune Metro: लिफ्ट, सरकते जिने आणि तिकीट यंत्रणा पूर्णपणे बंद; स्थानकांवर अचानक अंधार पसरल्याने प्रवाशांची उडाली धांदल.

Pune Metro – पुणे मेट्रोची मार्गिका क्रमांक १ वरील (पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट) वीजपुरवठा खंडित झाल्याने रविवारी दुपारी सुमारे अर्ध्या तासासाठी मेट्रो सेवा विस्कळीत झाली. पिंपरी-चिंचवड आणि रेंज हिल्स येथील वीजपुरवठ्यात बिघाड झाल्याने मार्गिकेवरील आठ मेट्रो गाड्या फलाटांवरच थांबवून ठेवल्या होत्या. तसेच, स्थानकांवरील दिवे, लिफ्ट, सरकते जिने आणि तिकीट यंत्रणेसह अन्य सुविधांचाही वीजपुरवठा खंडित झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
दुपारी १२.२५ वाजेच्या दरम्यान हा बिघाड झाला. त्यामुळे अर्ध्या तासासाठी प्रवाशांना स्थानकांवरच मेट्रो सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागली. वीजपुरवठा बंद होताच स्थानकांवर प्रवाशांना व्यवस्थापनाकडून मेट्रोला विलंब होणार असल्याच्या सूचना दिल्या होत्या. मेट्रोच्या तांत्रिक पथकाने पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरू करण्याच्या प्रयत्नांना दुपारी १२.४७ वाजता यश आले.
त्यापुढे फलाटांवर थांबवलेल्या आठही गाड्या रवाना झाल्या. मात्र, स्थानकांवरील वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी आणखी काही वेळ लागला. दुपारी १.०६ वाजता स्थानकांवरील वीजपुरवठा सुरू झाला, तर रेंजहिल्स येथील मुख्य वीजपुरवठा १.५० वाजता पूर्ववत केला. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल मेट्रो प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
मेट्रो सुरू होताच स्थानकावर धावपळ
स्थानकांवरीस वीजपुरवठा खंडित झाल्याने प्रवाशांना स्थानकात ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागला. तसेच, काही काळासाठी खंडित झालेली सेवा पुन्हा सुरू होईपर्यंत प्रवाशांचे प्रमाण वाढल्याने पिंपरी-चिंचवडच्या दिशेने आलेल्या मेट्रोत मोठी गर्दी होती. रविवारचा दिवस असल्याने नागरिक खरेदी, गाठी भेटी आणि इतर अनेक कारणांसाठी पुणे ते पिंपरी-चिंचवड आणि मध्यवर्ती स्थानकांवर प्रवास करीत असतात.





