Pune RTO: खासगी बसवाल्यांनी जास्त भाडे मागितले? ‘या’ व्हॉट्सॲप नंबरवर करा थेट आरटीओकडे तक्रार
Pune RTO: गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची लूट रोखण्यासाठी पुणे आरटीओची ११ ते २६ सप्टेंबरदरम्यान विशेष तपासणी मोहीम.

Pune RTO – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व जिल्ह्यातून कोकणासह इतर भागात जाणाऱ्या प्रवाशांची लूट थांबविण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने विशेष मोहीम सुरू केली आहे. गर्दीचा फायदा घेत अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स आणि बसमालकांविरोधात दि. ११ ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत कडक तपासणी केली जाईल.
शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा (एसटी भाड्याच्या दीडपट) अधिक भाडे आकारल्यास थेट कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश आरटीओ प्रशासनाने दिले आहे. गणेशोत्सवासह सणासुदीच्या काळात पुण्यातून कोकण, मराठवाडा आणि विदर्भात जाणाऱ्या हजारो चाकरमान्यांची मोठी गर्दी होते. यावेळी रेल्वेचे बुकिंग अधिक फुल्ल झाल्यामुळे प्रवासी एसटीकडे वळतात.
मात्र, एसटीला गर्दी अधिक असल्यामुळे काही प्रवासी खासगी बसला प्राधान्य देतात. त्याचा फायदा घेत काही खासगी बस चालकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन प्रवाशांची लूट करीत असल्याच्या तक्रारी येतात. त्याच पार्श्वभूमीवर पुणे आरटीओने खासगी कंत्राटी परवाना बस चालकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या त्या त्या संवर्गातील बस भाड्याच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक भाडे आकारता येणार नाही, असे स्पष्ट केले.
म्हणजेच एसटीच्या प्रवासी तिकीट दराच्या दीडपटपेक्षा जास्त भाडे आकारण्यास खासगी ट्रॅव्हल्सना नियमाने बंदी आहे. तसेच, सर्व खासगी बसमालक आणि चालकांनी आपल्या वाहनांची सर्व कागदपत्रे वैध असल्याची खात्री करूनच वाहने रस्त्यावर उतरावीत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केले आहे.
प्रवासादरम्यान कोणत्याही खासगी बस चालकाने जादा भाडे मागितल्यास किंवा प्रवाशांना मानसिक त्रास दिल्यास, नागरिक थेट आरटीओकडे तक्रार करू शकतात. प्रवाशांनी आपले नाव, मोबाईल क्रमांक आणि तिकिटाच्या छायाचित्रासह तक्रार द्यावी. त्यासाठी ८२७५३३०१०१ हा अधिकृत व्हाॅट्सॲप क्रमांक आणि [email protected] हा ई-मेल आयडी प्रसिद्ध करण्यात आला आहे.





