Pune RTO: आरटीओचा नवा नियम! आधार कार्ड अन् RC बुकवरील ‘ही’ चूक पडेल महाग; काम अडकण्यापूर्वी हे करा
Pune RTO: पुणे RTO च्या कार्यक्षेत्रात असाल तर ऑनलाइन अर्ज करून भरा शुल्क; आरटीओ कामासाठी कागदपत्रांची पडताळणी ठरतेय अनिवार्य.

Pune RTO – वाहनधारकांनो तुम्हाला तुमचे वाहन मालकी हक्क हस्तांतरण किंवा अन्य आरटीओ कामासाठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर थांबा..! आधी तुमचे आधार कार्ड आणि आरसी बुकवरील नाव, पत्ता किंवा पिनकोडमध्ये फरक असेल तर ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी ती दुरुस्त करून घ्या, अन्यथा आरटीओची कामे होऊ शकणार नाही.
वाहन प्रणालीतील तांत्रिक सुधारणांमुळे ज्या वाहनधारकांच्या प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) पुणे अंतर्गत वाहन संगणकीय प्रणालीमध्ये काही महत्त्वाचे तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. वाहन मालकी हक्क हस्तांतरण (टीओ) यांसह इतर विविध ऑनलाइन सेवांचा यात समावेश आहे. मात्र, या नवीन तांत्रिक सुधारणांमुळे ज्या वाहनधारकांच्या आधार कार्ड आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्रावरील (आरसी बुक) नाव,
पत्ता किंवा पिनकोड यामध्ये तफावत आहे, त्यांना ऑनलाइन अर्ज करताना अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी नागरिकांसाठी आवाहन केले. ज्या वाहनधारकांचे आधार कार्ड आणि आरसी बुकवरील नाव, पत्ता आणि पिनकोड पूर्णपणे एकसारखे आहेत, त्यांना कोणतीही अडचण येणार नाही.
ते नेहमीप्रमाणे ऑनलाइन पद्धतीने वाहन प्रणालीवर अर्ज करून आपले काम पूर्ण करू शकतात. मात्र, ज्या प्रकरणांमध्ये आधार कार्ड आणि आरसी बुकवरील नावामध्ये किंवा पत्त्यातील काही मजकुरामध्ये किरकोळ बदल असेल, अशा वाहनधारकांनी आधी आरसी बुकमधील दुरुस्तीसाठी आरटीओ कार्यालयात अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
कार्यालयामार्फत ही दुरुस्ती करून दिल्यानंतरच अर्जदार पुढील ऑनलाइन कामासाठी अर्ज करू शकतील. तसेच, ज्या वाहनधारकांचा आधार कार्ड आणि आरसी बुकवरील पत्ता पूर्णपणे वेगळा आहे, परंतु आधार कार्डवरील नवीन पत्ता पुणे आरटीओच्या कार्यक्षेत्रातील आहे, अशा नागरिकांनी पत्ता बदलण्यासाठी ऑनलाइन अर्ज करून आवश्यक शुल्क भरणे गरजेचे आहे.
वाहन प्रणालीतील या तांत्रिक बदलांमुळे नागरिकांची धावपळ होऊ नये आणि त्यांचे काम वेळेत व्हावे, यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांनी आपल्या कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन आरटीओ प्रशासनाने केले आहे.





