Pune News: अधिकाऱ्यांच्या ठिय्या आंदोलनावर तोडगा नाही! लढा तीव्र करण्याचा कृषी सेवा महासंघाचा इशारा
Pune News: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट देऊनही आकृतिबंध रद्द करण्याबाबत स्पष्ट आश्वासन न दिल्याने आंदोलकांत तीव्र असंतोष.

Pune News – प्रस्तावित कृषी विभागाच्या आकृतिबंधाविरोधात राज्यभरातील हजारहून अधिक कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारी (दि. ७) कृषी आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन केले. मात्र, प्रस्तावित आकृतिबंध रद्द करणे, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणे किंवा तज्ज्ञ समिती नियुक्त करण्याबाबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजी राहिली.
कृषी सेवा महासंघाचे अध्यक्ष बाबासाहेब जेजुरकर यांनी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन नियोजित टप्प्यांनुसार तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला. राज्यभरातील सहाय्यक कृषी अधिकारी ते कृषी संचालक स्तरावरील हजारो अधिकारी- कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. कृषी सेवा महासंघाने आंदोलनादरम्यान तीन प्रमुख मागण्या मांडल्या. यामध्ये प्रस्तावित व तांत्रिक अन्यायकारक असणारा आकृतिबंध तात्काळ रद्द करण्यात यावा,
सर्वसमावेशक तज्ज्ञ समिती नेमून न्यायपूर्ण तांत्रिक शेतकरी केंद्रित व भविष्याच्या दृष्टीने नवा आकृतिबंध तयार करण्यात यावा. अपारदर्शक व अनियमितता ठेवून तांत्रिक संवर्गावर अन्याय करणारा शेतकऱ्यांच्या हिताचा नसणारा आकृतिबंध तयार करणाऱ्या व शासनाचे दिशाभूल करणाऱ्या काही दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई प्रस्तावित करावी, अशी मागणी केली.
दरम्यान कृषी पदवीधर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. अनंतराव चोंदे पाटील हे मागण्यांसाठी गेल्या दोन दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आंदोलनस्थळ व उपोषणस्थळी भेट देत मागण्यांबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. याशिवाय कृषिमंत्री सचिव आणि महासंघाच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन महासंघाच्या मागण्यांवर तोडगा काढण्यात येईल, असेही सांगितले.
मात्र, प्रस्तावित आकृतिबंध रद्द करणार का? दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? तज्ज्ञ समिती नेमणार का, याविषयी कृषिमंत्र्यांनी कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. दरम्यान आंदोलनस्थळी माजी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार रोहित पवार यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून त्यांना पाठिंबा दिला.






