Radha Patil: परवानगी नाकारली तरी घेतला कार्यक्रम! प्रसिद्ध लावणी कलावंत राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Radha Patil: सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र सादर न केल्याने बिबवेवाडी पोलिसांनी परवानगी नाकारूनही दहीहंडीत लावणी कार्यक्रमाचे आयोजन.

Radha Patil – दहीहंडीतील लावणी कार्यक्रमासाठी आवश्यक प्रमाणपत्रे सादर न केल्याने बिबवेवाडी पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल लावणी नृत्यांगणा राधा पाटील हिच्यासह मंडळाचे अध्यक्ष, आयोजकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अश्लील नृत्यप्रकार सादर होऊ नयेत, यासाठी कलाकारांनी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र(सेन्सॉर बोर्ड) सादर करणे बंधनकारक केले होते.
लावणी नृत्यांगणा राधा पाटील (रा. मुंबई), एम्पायर ग्रुप ए. के. बॉइजचे अध्यक्ष भूषण अभिमान सोनवणे (रा. सुखसागरनगर, कात्रज) आणि आयोजक अमोल काटे (रा. कात्रज) यांच्यावर बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस हवालदार नंदलाल हरिचंद्र भादले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दहीहंडीनिमित्त एम्पायर ग्रुप ए. के. बॉइजचे अध्यक्ष भूषण सोनवणे यांनी राधा पाटील यांच्या लावणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाच्या परवानगीसाठी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात अर्ज केला होता. महाराष्ट्रातील कला, लोककला, चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यक्रमांबाबत रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या नियमांनुसार आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे सादर करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या. डळाचे अध्यक्ष, आयोजक तसेच राधा पाटील यांनी प्राधिकृत कागदपत्रे सादर केले नाहीत. त्यामुळे कार्यक्रमास परवानगी नाकारली होती. असे असतानाही कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल कारवाई करण्यात आली.





