Pune Police Action: डीजेचा दणधणाट महागात पडला! दहीहंडीत ध्वनीमर्यादा ओलांडणाऱ्या ११६ मंडळांवर गुन्हे दाखल
Pune Police Action: दहीहंडी उत्सवात ध्वनीप्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवून डीजे व प्रेशर साऊंड वापरणाऱ्या मंडळांवर पोलिसांची कारवाई.

Pune Police Action – दहीहंडी उत्सवात ध्वनीक्षेपकाची निर्धारित मर्यादा ओलांडल्याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी तब्बल ११६ मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी तब्बल एक हजार मंडळांचे रिडिंग घेतले होते. त्याचे विश्लेषण केल्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला. दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनीप्रदूषण नियंत्रणासाठी पोलिसांनी मंडळांना ध्वनीमर्यादेचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
आवाजाची निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ध्वनीक्षेपक, डीजे तसेच अन्य ध्वनिवर्धक यंत्रणांचा वापर करणाऱ्या मंडळांचा समावेश आहे. दरम्यान, नागरिकांच्या सहभागातून ‘ध्वनीक्षेपकविरोधी पुणेकर मंचा’ने शहरातील विविध भागांत ध्वनीपातळीची नोंद केली. नागरिकांनी प्रत्यक्ष ठिकाणी आवाजाची तीव्रता आणि संबंधित ठिकाणाची माहिती नोंदवून हा डेटा संकलित केला.
त्यानुसार ५९ ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे मंचाचे म्हणणे आहे. पोलिसांकडून मंडळांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू असली, तरी उत्सव काळात ध्वनीप्रदूषणावर सातत्याने लक्ष ठेवण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ध्वनीक्षेपकाच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसोबतच ध्वनीपातळीचे नियमित मोजमाप आणि त्याची नोंद ठेवण्याची मागणीही करण्यात येत आहे.
फरासखाना पोलीस ठाण्यात गणेशपेठ, पांगुळआळी दहीहंडी उत्सव समितीच्या विजय सुतार(४०) आणि नरसिंह रेड्डी(३२) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी प्रेशर मिड साऊंड लावल्याचे आढळले. कोथरुड पोलीस ठाण्यात अखिल बंजारा समाज मंडळाचे अध्यक्ष राहुल कटरावत(३२), स्पिकरचालक चिरंजीवी भिंगरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना डीजे बंद करण्याचा आदेश देऊनही डीजे बंद केला नव्हता
“शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु आहे. यामुळे गुन्हे दाखल झालेल्या मंडळांची संख्या आणखी वाढू शकते.”
– प्रशांत अमृतकर (उपायुक्त, विशेष शाखा)






