Lemon Price: पावसाळ्यातही लिंबाचा भाव तेजीत! मार्केट यार्डात आवक घटल्याने किमती भडकल्या; पाहा नवे दर
Lemon Price: एरवी पावसाळ्यात स्वस्त मिळणाऱ्या लिंबासाठी यंदा मोजावे लागत आहेत अधिक पैसे; आगामी सणासुदीत दर आणखी वाढण्याचा अंदाज.

Lemon Price – पावसाळ्यात लिंबूला कवडीमोल भाव मिळतो. यंदा परिस्थिती वेगळी आहे. जुलै-ऑगस्टमध्ये तोडणीसाठी येणारे कच्चे,अपरिपक्व लिंबु उन्हाळ्यात मार्च-एप्रिलमध्ये तोडण्यात आले. त्यामुळे सझ्या बाजारात लिंबाचा तुटवडा आहे. परिणामी पावसाळ्यात लिंबाला चढा भाव मिळत आहे. दरवर्षी घाऊक बाजारात किलोला ८ ते २० रुपये भाव मिळणाऱ्या लिंबालाआता दर्जानुसार ६० ते १४० रुपये भाव मिळत असल्याची माहिती मार्केट यार्डातील लिंबाचे व्यापारी रोहन जाधव यांनी दिली.
किरकोळ बाजारातही दर्जानुसार लिंबाच्या नगास ५ ते १० रुपये मोजावे लागत आहेत. मार्केट यार्डात जिल्ह्यासह सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यातून लिंबाची आवक होते. रविवारी (दि.६) १ हजार ते १२०० गोणी आवक झाली. सोमवारी (दि.७) २०० ते ३०० गोणी आवक झाली. एका गोणीत १८ ते २० किलो लिंबू असतात.
पावसाळ्यात कमी भाव मिळतील या शक्यतेने उन्हाळ्यातच शेतकऱ्यांनी कच्च्या लिंबाची तोड केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या श्रावण महिना सुरू आहे. श्रावण, गणपतीनंतर लोक मासांहारास सुरूवात करतात. त्यावेळी मागणी वाढून लिंबाच्या भावात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. भाव वाढल्यास परराज्यातून लिंबाची आवक होते. यंदा स्थानिक ठिकाणी चांगले भाव मिळत असल्याने परराज्यातून आवक होत नाही.
लोणचे उत्पादकांच्या खिशाला कात्री
पावसाळ्यात जून ते ऑगस्ट आणि थंडीमध्ये नोव्हेबर ते जानेवारी दरम्यान लिंबाना मागणी कमी असते. परिणामी, भाव कमी मिळतो. या कालावधीत लोणचे उत्पादक लिंबाची खरेदी करतात. यंदा अधिक पैसे देऊन लिंबाची खरेदी करावे लागत आहे.
“यंदा पावसाळ्यात लिंबाचा तुटवडा आहे. बाजारात नेहमीच्या तुलनेत निम्मीच आवक होत आहे. त्यामुळे लिंबाचे भाव तेजीत आहेत. त्यात लवकर घट होण्याची शक्यता नाही.”
– रोहन जाधव, लिंबाचे व्यापारी मार्केट यार्ड





