Pune News: शिक्षक अन् विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला! पुण्यातील १,८९५ शाळांना ‘त्रुटीं’चा भयंकर फटका
Pune News: राज्यातील १ हजार ८९५ शाळांच्या संचमान्यतेत विविध त्रुटी; सुमारे ९० हजार ८४३ विद्यार्थ्यांच्या नोंदींवर थेट परिणाम.

Pune News- शाळांच्या संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीची मुदत आता १० ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. संचमान्यतेसंदर्भात १ हजार ८९५ शाळांमध्ये विविध त्रुटी आढळल्याने सुमारे ९० हजार ८४३ विद्यार्थ्यांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शाळांच्या संचमान्यतेच्या माध्यमातून विद्यार्थी संख्येनुसार आवश्यक शिक्षक पदे विद्यार्थ्यांना मिळतात. त्यावर शिक्षकसंख्या, वेतन, पदांची मंजुरी आणि शाळेचे प्रशासकीय नियोजन अवलंबून असते.
शाळांना संच मान्यता पूर्ण करून घेण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, काही शाळांच्या संच मान्यतेत त्रुटीच आढळून आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांची पटनोंदणी करताना माहितीमध्ये त्रुटी राहिल्यास संबंधित विद्यार्थ्यांची नोंद संचमान्यतेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही. केवळ योग्य माहिती असलेले विद्यार्थीच विचारात घेतले जातील, असे माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी स्पष्ट केले होते.
संचमान्यता वेळेत पूर्ण न झाल्यास शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासह प्रशासकीय बाबींवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. संच मान्यता न झाल्यामुळे सुमारे ३० ते ३५ टक्के शिक्षकांचे वेतन थांबले असल्याचे शिक्षण विकास मंचने म्हटले आहे. त्यामुळे हा प्रश्न गांभीर्याने घेऊन पुरेशी विद्यार्थीसंख्या असलेल्या शाळांची संचमान्यता तातडीने मंजूर करावी, अशी मागणी त्यांनी शालेय शिक्षण विभागाकडे केली आहे.
ज्या शाळांची विद्यार्थीसंख्या शालार्थ प्रणालीवर पूर्णपणे अद्ययावत झाली आहे, अशा शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांची संचमान्यता तातडीने मंजूर केल्यास संचमान्यतेअभावी थांबलेले शिक्षकांचे वेतन पूर्ववत होण्यास मदत होईल. या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.





