प्रभात वृत्तसवा पुणे – २०१६ पासून वेतनाशिवाय काम करणाऱ्या एका शिक्षिकेचा शालार्थ आयडी मंजूर करून देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. यामुळे खळबळ उडाली आहे.रावसाहेब भगवान मिरगणे (वय ५७) असे लाच स्वीकारणाऱ्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. याबाबत ५६ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या पत्नी सोलापूर जिल्ह्यातील एका शाळेत सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांना शालार्थ आयडी नसल्याने २०१६ पासून विनावेतन काम करीत आहेत. त्यांचा शालार्थ आयडी मंजूर झाल्यानंतर त्यांना वेतन चालू होणार होते. त्यांच्या आयडी मंजुरीचा प्रस्ताव १६ जून रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात दाखल केला होता. हा प्रस्ताव ई-ऑफिसमार्फत मंजूर करून देण्यासाठी उपनिरीक्षक मिरगणे यांनी तक्रारदार यांच्याकडे एक लाख रुपयांची लाच मागितली. याबाबत संबंधिताने एसीबीकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार १७ आणि २१ नोव्हेंबर रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली. २१ नोव्हेंबर रोजी झालेल्या पडताळणीत मिरगणे याने शालार्थ आयडी मंजूर करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर बुधवारी (दि.२५) सायंकाळी साडेसहा वाजता विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील स्वतःच्या केबिनमध्ये तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना मिरगणे यांना पंचासमक्ष एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.