Pune News : नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच पुण्यात राजकीय भूकंपाची चिन्हे आहेत. एका राजकीय पक्षाचे पाच माजी नगरसेवक भाजप मध्ये प्रवेश करणार असून या नगरसेवकांनी नुकतीच पुण्यातील एका मोठया राजकीय नेत्यासोबत भाजपच्या राज्यातील नेत्यांची मुंबईत जावून भेट घेतली आहे. त्यानंतर लवकरच हे नगरसेवक मुंबई अथवा पुण्यात भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांच्या पाठोपाठ राज्यात पुढील काही महिन्यात राज्यात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे. त्यातच, राज्यात लोकसभा निवडणूकीत पिछेहाट झालेल्या भाजपला विधानसभा निवडणूकीत मतदारांनी पसंती दिली असून पुण्यातही भाजपला शत प्रतिशत यश मिळाले असून भाजपच्या सर्व जागा निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे, २०१७ मध्ये महापालिकेवर निर्विवाद यश मिळालेल्या भाजपची सत्ता महापालिकेतही कायम राहण्याची शक्यता असल्याने या बडया राजकीय पक्षाच्या नगरसेवकांनी धसका घेतला असून भाजपमध्ये जाण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी, या पाच नगरसेवकांनी नुकतीच मुंबई वारी केली असून त्यांना पक्षात पद देण्यासह, महापालिका निवडणूकीचे तिकिटही देण्याची तयारी भाजपकडून दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे, महापालिका निवडणूकीत भाजप विरोधात लढण्यापेक्षा त्यांच्या सोबत जाण्याची भूमिका या माजी नगरसेवकांनी घेत भाजपची वाट धरली असून पुढील काही दिवसात ते भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात काही विधानसभेसाठी इच्छूक असलेल्या माजी नगरसेवकांचाही समावेश असून दोन महिला तर तीन पुरूष माजी नगरसेवकांचा समावेश आहे.