Pune News : डेक्कन बसस्थानकातून पीएमपीएमएल बस चोरीचा प्रयत्न; पोलिसांच्या पाठलागानंतर आरोपी ताब्यात
शहरात शनिवारी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास डेक्कन बसस्थानक परिसरात (Pune News) एक धक्कादायक प्रकार घडला.

Pune News : शहरात शनिवारी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास डेक्कन बसस्थानक परिसरात (Pune News) एक धक्कादायक प्रकार घडला. पीएमपीएमएलची बस चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी गुडलक चौकाजवळ पाठलाग करून अखेर ताब्यात घेतले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने डेक्कन बसस्थानकातून (Pune News) बस पळविण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.
त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत बसचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर गुडलक चौकाजवळ आरोपीला अडवण्यात पोलिसांना यश आले.
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे काही वर्षांपूर्वी स्वारगेट परिसरात घडलेल्या संतोष माने प्रकरणाची आठवण नागरिकांना झाली. त्या घटनेत आरोपीने बस चालवत अनेकांना चिरडले होते, ज्यामध्ये काही जणांचा मृत्यू झाला होता.
आजच्या घटनेतही तशाच प्रकारची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. सदर प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
पीएमपी बस चालवत नेल्याप्रकरणात संबंधिताविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मोटार व्हेईकल ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. गोपालसिंग राणा (अंदाजे वय २०, मुळ रा. उत्तराखंड) असे त्याचे नाव आहे. आरोपीचा नेमका उद्देश काय होता, याचा शोध (Pune News) घेतला जात आहे.






