Omraje Nimbalkar: ओमराजे निंबाळकर पुण्यात MPSCच्या आंदोलनात येताच, विद्यार्थांकडून ‘गो बॅक’चा नारा
Omraje Nimbalkar: तुम्हाला पाठिंबा द्यायला आलो माझं चुकलं का? ओमराजे निंबाळकरांचा सवाल

Omraje Nimbalkar: धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पुण्यातील MPSCच्या आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थांना पाठिंबा दिला. मात्र ओमराजे येताच विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. काही दिवसांपूर्वी ओमराजे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली.
विद्यार्थ्यांचा विरोध आणि घोषणाबाजी पाहता विवेकानंद पाटीलने विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ओमराजे आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आहेत. त्यांची वैयक्तीक राजकीय भुमिका काहीही असो ते आपल्याला पाठींबा देण्यास आले आहेत. आपण त्यांचा मान राखला पाहिजे. सरकारने आधीच आपल्या आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच आंदोलनाला गालबोट लागेल असं काहीही करु नका, सरकारला हेच हवं आहे, असं विवेकानंद पाटील याने सांगितले.
‘गो बॅक’चा नारा देत विद्यार्थांकडून रोष व्यक्त
यावेळी ओमराजे निंबाळकर भाषणाला उभे राहताच काही आंदोलकांनी पक्षांतरचा मुद्दा उपस्थित केला. तसेच ‘गो बॅक’चा नारा दिला. त्याला उत्तर देताना ओमराजे म्हणाले की, “ओमराजे असाच ओमराजे झाला नाही. खालून धडका घेऊन इथपर्यंत आलोय. इथे बसलेले विद्यार्थी मला पक्षांतराविषयी बोलले. मी 24 तास मतदारसंघात खपतोय, लोकांची कामं करतोय. सर्वसामान्य माणसाची साथ सोडली नाही. त्या मतदारसंघात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक झाली. पण आमचा एकही उमेदवार निवडून आला नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून मी पक्षांतराचा निर्णय घेतला.”
पुढे ओमराजे निंबाळकर म्हणाले की, तुमची परीक्षा आयुष्यभरासाठी आहे, आमची निवडणुक 5 वर्षापुरती आहे. आमच्या पेक्षा तुमच्या यातना खुप जास्त आहेत. मला तुमच्या ज्या मागण्या आहेत, त्या मागण्या मान्य आहेत. सर्वसामान्य माणसाच्यासोबत जसा माझा कनेक्ट आहे तसाच आहे. तुम्हाला पाठिंबा द्यायला आलो माझं चुकलं का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ओमराजेंचे विद्यार्थ्यांना आश्वासन
यावेळी काही विद्यार्थ्यांनी एकनाथ शिंदे यांना फोन करून राजीनामा मागण्याची मागणी ओमराजेंकडे केली. त्यावर तुमच्या मागणी बाबत मी तुमचा प्रतिनिधी म्हणून मी कुठल्याही पक्ष राजकारणावर बोलण्यापेक्षा तुमचा जो विषय आहे तो घेऊन मी मुख्यमंत्र्यांना भेटणार, मी राज्य सरकार म्हणून त्यांना विनंती करेल,” असे आश्वासन ओमराजे यांनी विद्यार्थ्यांना दिले. परंतु त्यानंतरही विद्यार्थी गो बॅकची घोषणाबाजी करत असल्याने ओमराजे निंबाळकर यांनी आपलं भाषण उरकतं घ्यावं लागलं. तसेच मोठ्या पोलिस बंदोबस्तात ओमराजेंना बाहेर काढण्यात आलं.
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासाठी आणि इतर मागण्यांसाठी पुण्यात गेल्या चार दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी त्या ठिकाणी ठिय्या मांडला आहे. या आंदोलनस्थळी आज संजय राऊत, सुषमा अंधार, कॉकरोच पार्टीचे नेते अभिजीत दिपके आले होते.
हेही वाचा:





