Pandharpur News: ठाकरेंच्या नेत्यावर मोठी कारवाई; एक वर्षासाठी थेट येरवडा कारागृहात रवानगी
Yerwada Jail: वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे पंढरपूर तालुका पोलीस आणि सोलापूर ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई

Pandharpur News: ठाकरेंच्या शिवसेनेचा उपनेता शरद विठ्ठल कोळी यांच्यावर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. MPDA कायद्यान्वये शरद कोळी यांना एका वर्षासाठी पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्धता करण्यात आले आहे.
झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, धोकादायक व्यक्ती आणि व्हिडिओ पायरेट्स यांच्या धोकादायक कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठीच्या MPDA कायद्यानुसार आठवडाभरापूर्वीच त्यांच्या स्थानबद्धतेचे आदेश काढण्यात आले होते. हे आदेश निघताच शरद कोळी पसार झाले होते. मात्र, सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना सांगलीतून ताब्यात घेतले.
त्यानंतर ४ ऑक्टोबर रोजी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात शरद कोळीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांच्या कडक बंदोबस्तात येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार, शरद कोळी याच्यावर सोलापूर आणि आसपासच्या परिसरात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवलेले आहेत. शरद कोळी यांच्यावर वाळू चोरी, खंडणी वसूल करणे, धमकी देणे आणि सार्वजनिक ठिकाणी प्रक्षोभक भाषणे देऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे, यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
त्यांच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे पंढरपूर तालुका पोलीस आणि सोलापूर ग्रामीण पोलिसांनी संयुक्तपणे ही कठोर पावले उचलली. दरम्यान, ठाकरे गटाच्या मोठ्या नेत्यावर एका वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई झाल्याने सोलापूरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा:
Pune Crime: “मीच त्याचा खून केलाय!” मित्राला रक्ताच्या थारोळ्यात पाडून आरोपी थेट पोलीस ठाण्यात हजर






