पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे-मिरज रेल्वे मार्गावर तारगाव-मसूर-शिरवडे सेक्शनमध्ये रेल्वे ट्रॅक दुहेरीकरण आणि विविध अभियांत्रिकी, सिग्नालिंग दूरसंचार कामांसाठी दि. 22 फेब्रुवारीला ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दि. 20 फेब्रुवारीपासून या मार्गावरील काही ट्रेन रद्द त्यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर-पुणे एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तर काही ट्रेन उशिराने धावतील तर लांब पल्ल्याच्या ट्रेन निम्म्या मार्गापर्यंत धावतील.
दि. 20 आणि 21 फेब्रुवारीला गाडी क्रमांक 01024 कोल्हापूर-पुणे एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तर दि. 21 आणि 23 रोजी 01023 पुणे-कोल्हापूर एक्सप्रेसही रद्द आहे. दि. 22 रोजी गाडी क्रमांक 11030 कोल्हापूर-मुंबई कोयना एक्सप्रेस, गाडी क्रमांक 11029 मुंबई-कोल्हापूर कोयना एक्सप्रेस रद्द केली आहे. दि. 21 आणि 22 फेब्रुवारीला पुण्यातून सुटणारी 11425 पुणे-कोल्हापूर एक्सप्रेसचा प्रवास सातारा येथे संपेल. तर याच दिवशी गाडी क्रमांक 11426 कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस सातारा येथून पुण्यासाठी सोडण्यात येईल.
तसेच दि. 21 आणि 22 रोजी सुटणारी डेमू क्रमांक 01542 कोल्हापूर-सातारा या गाडीचा प्रवास कराडला संपेल. तर डेमू क्रमांक 01541 सातारा-कोल्हापूर चा प्रवास कराड येथून सुरू होईल. दि. 21 रोजी गोंदिया येथून सुटणारी गाडी क्रमांक 11040 गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसचा प्रवास पुण्यात संपेल. तर दि. 22 रोजी कोल्हापूर येथून सुटणारी गाडी क्रमांक 11039 कोल्हापूर- गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस पुणे येथून सुटेल.
काही महत्वाचे…
– दि. 21 रोजी हजरत निजामुद्दीन येथून सुटणारी गाडी क्रमांक 12630 हजरत निजामुद्दीन- यशवंतपूर एक्सप्रेस दौंड-कुर्डुवाडी-पंढरपूर-मिरज या वळवलेल्या मार्गाने धावेल. ही गाडी पुण्याला येणार नाही.
– दि. 21 रोजी दिवशी बेंगळुरूहून सुटणारी गाडी क्र. 16505 बेंगळुरू-जोधपूर एक्सप्रेस मिरज-पंढरपूर-कुर्डुवाडी-दौंड-पुणे या वळवलेल्या मार्गावर धावेल आणि ही गाडी सांगली, कराड आणि सातारा येथे येणार नाही.
– दि. 17 आणि 18 फेब्रुवारीला कोल्हापूरहून सुटणारी गाडी क्रमांक 11030 कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस कोल्हापूर येथून नियमित सुटण्याची वेळ 08.15 ऐवजी 10.15 वाजता अर्थात दोन तास उशिराने सुटेल.