Pune Gramin | खतासाठी गेलेल्या शेतकऱ्याशी वाद; कृषी सेवा केंद्राचा परवाना निलंबित

प्रभात वृत्तसेवा
शिरूर – शेतकऱ्यांशी अरेरावी, कृषी अधिकाऱ्यांविषयी अपमानकारक वक्तव्य आणि तपासणीत आढळलेल्या गंभीर त्रुटींमुळे मलठण (ता. शिरूर) येथील न्यू भैरवनाथ कृषी सेवा केंद्राचा परवाना जिल्हा कृषी अधिक्षक संजय काचोळे यांच्या आदेशावरून ९० दिवसांसाठी निलंबित करण्यात आला आहे.
अण्णापूर (ता. शिरूर) येथील शेतकरी बापू रतन कुरंदळे हे खत खरेदीसाठी मलठण येथील कृषी सेवा केंद्रात गेले होते. मात्र, केंद्र चालक नाना फुलसुंदर यांनी त्यांच्याशी मोबाईलवर अरेरावीची भाषा वापरली. यावेळी शेतकऱ्यावर बेकायदा लिंकिंग खत घेण्याची जबरदस्ती करण्यात आली.
कुरंदळे यांनी या प्रकाराला विरोध केला असता, फुलसुंदर यांनी केवळ त्यांच्याशीच नव्हे तर शिरूर तालुका कृषी अधिकारी संपत कंठाळे यांनाही शिवीगाळ केली.या प्रकारामुळे संतप्त शेतकरी कुरंदळे यांनी सामाजिक कार्यकर्ते नीलेश वाळुंज यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसह शिरूर तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाला मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा पाठिंबा लाभला.
यानंतर जिल्हा कृषी अधिक्षकांच्या सुचनेनुसार जिल्हास्तरीय भरारी पथकाने कृषी सेवा केंद्राची तपासणी केली. या पथकात कृषी विकास अधिकारी अजित पिसाळ, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक धनंजय पाटील, तालुका कृषी अधिकारी सुवर्णा आदक, कृषी अधिकारी संपत कंठाळे व मोहीम अधिकारी विनय कदम होते.
तपासणी दरम्यान कृषी सेवा केंद्र व गोडाउनमध्ये अनेक गंभीर त्रुटी, नियमभंग व गैरप्रकार आढळून आले. केंद्र चालकाला त्याबाबत समाधानकारक खुलासा करता आला नाही. परिणामी, जिल्हा कृषी अधिक्षकांनी कठोर निर्णय घेत सेवा केंद्राचा परवाना ९० दिवसांसाठी निलंबित करण्याचे आदेश काढले.
या कारवाईमुळे शेतकऱ्यांचा आवाज किती परिणामकारक ठरतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. तसेच कृषी सेवा केंद्रांनी शेतकऱ्यांशी प्रामाणिक वर्तन करावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही या घटनेमुळेमिळाला आहे.





