Indrayani River Flood: चिंबळी-मोशी बंधारा केव्हाही कोसळणार? महापुरात ४० वर्षे जुना बंधारा धोक्यात
Indrayani River Flood: ४० वर्षांपूर्वी बांधलेल्या चिंबळी-मोशी बंधाऱ्याचे अतोनात नुकसान; दोन्ही बाजूंचा मातीचा भराव वाहून गेल्याने वाहनचालक आणि ग्रामस्थांचे प्रचंड हाल.

Indrayani River Flood – गेल्या आठवड्यापासून मुंबईसह मावळ पट्ट्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला मोठा महापूर आला आहे. या पुराच्या पाण्याचा मोठा फटका चिंबळी-मोशी हद्दीतून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीवरील के. टी. (कोल्हापूर पद्धतीचा) बंधाऱ्याला बसला आहे. पुराचे पाणी बंधाऱ्यावरून वाहिल्यामुळे ४० वर्षे जुन्या बंधाऱ्याचे मोठे नुकसान झाले असून, बंधारा अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने या बंधाऱ्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे.
पुराच्या प्रवासासोबत वाहून आलेली मोठी झाडे, झुडपे आणि कचरा बंधाऱ्याच्या मोऱ्यांमध्ये अडकले आहेत. यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत असून, बंधाऱ्यावरील पाण्याचा दाब आणखी वाढला आहे. बंधारा केव्हाही खचण्याची भीती निर्माण झाल्याने स्थानिक प्रशासनाने तत्काळ पावले उचलत या मार्गावरील वाहतूक थांबवली आहे. हा बंधारा चिंबळी आणि मोशी परिसरातील गावांना जोडणारा एक महत्त्वाचा मार्ग आहे.
वाहतूक बंद झाल्याने वाहनचालक आणि ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि संबंधित प्रशासनाने तातडीने या बंधाऱ्याची पाहणी करावी, अडकलेली झाडेझुडपे काढून बंधाऱ्याची दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या विद्युत पंप मोटारी पाण्यात बुडाल्या असुन विजेचे खांब पडून तारा तुटल्याने या परिसरात चार ते पाच दिवसांपासून विजपुरवठा खंडीत झाला आहे.
भराव वाहून गेला, बंधाऱ्याला पडल्या भेगा
महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुमारे ४० वर्षांपूर्वी या बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, यावेळच्या पुरामुळे बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंचा मातीचा भराव पूर्णपणे वाहून गेला आहे. तसेच, पाण्याच्या प्रचंड दाबामुळे बंधाऱ्याला ठीकठिकाणी मोठ्या भेगा पडल्या आहेत.





