Veer Dam: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी! ‘वीर धरण’ १०० टक्के भरले; ऊस लागवडीला मोठा दिलासा
Veer Dam: वीर धरणातून नीरा नदीपात्रातील विसर्ग तुर्तास बंद; दोन्ही मुख्य कालव्यांमधून सिंचनासाठी पाणी सोडल्याने शेती आणि उद्योगांना मोठा आधार.

Veer Dam – संपूर्ण जून महिना पावसाच्या प्रतीक्षेत गेल्यानंतर आता नीरा नदीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेती अन उद्योगांसाठी दिलासादायक बाब पुढे येत आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेले वीर धरण गुरुवारी (दि.9) दुपारी 4 वाजेपर्यंत शंभर टक्के भरले असून धरणात 9.408 टीएमसी (100 टक्के) पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. धरणात सध्या 224 क्यूसेक पाण्याची आवक सुरू असून सांडव्यावरून कोणताही विसर्ग करण्यात येत नाही.
विशेष म्हणजे, (दि.८) वीर धरणातून नीरा नदीपात्रात 6 हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात येत होते. मात्र, गुरुवारी सकाळपासून हा विसर्ग पूर्णपणे बंद केला आहे. त्याचवेळी नीरा डावा कालवा आणि नीरा उजवा कालवा या दोन्ही कालव्यांमधून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे वीर धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीला मोठा दिलासा मिळाला आहे.
नीरा खोऱ्यातील चारही प्रमुख धरणांमध्ये मिळून 29.572 टीएमसी म्हणजेच 61.18 टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 34.282 टीएमसी (70.93 टक्के) होता. यंदा साठा तुलनेने कमी असला तरी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा सातत्याने वाढत आहे. भाटघर धरणात 459 मिमी पाऊस झाला असून 11.363 टीएमसी (48.35 टक्के) पाणीसाठा आहे. 202 क्यूसेक पाण्याची आवक सुरू आहे.
नीरा देवघर धरणात आतापर्यंत 879 मिमी पाऊस नोंदला गेला आहे. 6.643 टीएमसी (56.54 टक्के) पाणीसाठा आहे. धरणात 112 क्यूसेक पाण्याची आवक सुरू आहे. गुंजवणी धरणात सर्वाधिक 955 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 2.158 टीएमसी (58.48 टक्के) पाणीसाठा आहे. 48 क्यूसेक पाण्याची आवक सुरू आहे. वीर धरण 100 टक्के भरले असून वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 248 मिमी पावसाची नोंद केली आहे. चारही धरणांमध्ये मिळून आज 0.586 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.
ऊस लागवडीत वाढ होणार
नवीन ऊस लागवडीला अंबवणी देण्यासाठी हे पाणी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे ऊस पिकाची वाढ चांगली होण्यास मदत होणार आहे. सिंचनाची उपलब्धता वाढल्याने आगामी काळात ऊस लागवडीच्या क्षेत्रातही वाढ होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.आगामी काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास नीरा खोऱ्यातील उर्वरित धरणांच्या पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.



