Khed Heavy Rain: खेड तालुक्यात अतिवृष्टीचा हाहाकार! ५ जणांचा मृत्यू, तर ४५० हेक्टरवरील शेती उद्ध्वस्त
Khed Heavy Rain: खेड तालुक्यात ३ ते ८ जुलैदरम्यान पावसाचा तांडव; चाकण, आळंदी, कुडे, पाईट आणि वाडा भागात एकाच दिवसात १०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद.

Khed Heavy Rain : खेड तालुक्यात ३ ते ८ जुलैदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली असून आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू, ३६ जनावरे दगावली आहेत. ४५० हेक्टर शेतजमीन व पिकांचे नुकसान झाल्याची माहिती खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी नायब तहसीलदार चेतन मोरे, राम बीजे, मनीषा खैरे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, कृषी अधिकारी विशाल विश्वे, महावितरणचे अभियंता उत्तम मंचरे, पंचायत समिती बांधकाम विभागाचे अभियंता जयंत कचरे उपस्थित होते. तहसीलदार बेडसे म्हणाले की, खेड तालुक्यातील चाकण, आळंदी, कुडे, पाईट आणि वाडा मंडळ या भागांत अतिवृष्टीची तीव्रता सर्वाधिक होती.
अनेक ठिकाणी एका दिवसात १०० ते ११० मिमी पावसाची नोंद झाली. या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले असून मृत व्यक्तींचे अधिकृत मृत्यू अहवाल प्राप्त होताच आपत्ती व्यवस्थापन निधीतून प्रत्येकी चार लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत संबंधित वारसांना देण्यात येणार आहे. अतिवृष्टीत २६ मोठी जनावरे, १२ शेळ्या आणि ४० कोंबड्यांचा मृत्यू झाला असून त्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. संबंधित शेतकरी व पशुपालकांना शासनाच्या निकषानुसार लवकरच आर्थिक मदत वितरित करण्यात येणार असल्याचे बेडसे यांनी सांगितले.
शेतबांध, भात रोपे, रोपवाटिका, भात खाचरे, शेती नुकसानीचे पंचनामे महसूल, कृषी व ग्रामपंचायत प्रशासनाच्या संयुक्त पथकांमार्फत सुरू असून हे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू करून मदतीसाठीचा अहवाल लवकरच वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बंद रस्ते व एसटी सेवा लवकरच पूर्ववत
अतिवृष्टीमुळे कडूस- कारमळा तसेच पाईट–अहिरे हे रस्ते काही काळ वाहतुकीसाठी बंद केले होते. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पुढील दोन दिवसांत हे मार्ग वाहतुकीसाठी खुले करण्यात येतील. राजगुरूनगर- येणिये, राजगुरूनगर- साकुर्डी आणि राजगुरूनगर-पाईट- राजगुरूनगर या मार्गांवरील रस्ते व पूल वाहून गेल्याने एसटी महामंडळाची बससेवा बंद ठेवावी लागली. संबंधित रस्ते व पुलांच्या दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू असून ती पूर्ण होताच एसटी सेवा पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
नुकसानभरपाईचे शासनाचे निकष
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी व पशुपालकांना शासनाच्या निकषानुसार पुढीलप्रमाणे आर्थिक मदत दिली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी आहे. त्यांना मदत मिळेल शेतजमीन खरडून वाहून गेल्यास –प्रति हेक्टरी ४७ हजार, ताली व शेतीबांध नुकसान प्रति हेक्टरी १८ हजार, भात रोपे व रोपवाटिका नुकसान प्रति हेक्टरी ८ हजार ५००, गाय किंवा म्हैस मृत्यू –प्रत्येकी ३७ हजार ५००, बैल – ३२ हजार, वासरे २० हजार, शेळी/मेंढी ४ हजार ७००. कोंबडी प्रति कोंबडी १०० मदत मिळणार आहे.





