Chaskaman Canal: चासकमान डाव्या कालव्याला भगदाड! अतिवृष्टीमुळे दोन ठिकाणी मोठे नुकसान, हजारो एकर शेतीचे पाणी धोक्यात
Chaskaman Canal: मुसळधार पावसामुळे चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याचे मोठे नुकसान; सातकरस्थळ आणि दावडी येथे पडली मोठी भगदाडे.

Chaskaman Canal – खेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याला मोठा फटका बसला आहे. सातकरस्थळ (पूर्व) आणि दावडी येथील दोन ठिकाणी कालव्याला मोठी भगदाडे पडल्याने कालव्याच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. खरीप हंगामातील आवर्तन सुरू होण्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा हजारो एकर शेतीचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चासकमान डाव्या कालव्याच्या किमी क्रमांक १८ वर सातकरस्थळ (पूर्व) येथे कालव्याच्या भरावाला मोठे भगदाड पडले आहे. या घटनेमुळे भराव मोठ्या प्रमाणात वाहून गेला असून, संपूर्ण संरचना धोक्यात आली आहे. या भागात पाटबंधारे विभागाने बाहेरील पाणी वाहून जाण्यासाठी एक पाईप टाकला होता. मात्र, यंदाच्या ढगफुटीसदृश पावसात पाण्याची आवक प्रचंड वाढल्याने तो पाईप अपुरा ठरला.
या ठिकाणी तातडीने मोठ्या क्षमतेचा पाईप टाकून भरावाची मजबूत दुरुस्ती करणे आवश्यक आहे. अन्यथा कालव्याचे आवर्तन सुरू झाल्यानंतर भगदाड अधिक वाढण्याची शक्यता असून, पाणी वाया जाण्याबरोबरच शेतीचेही मोठे नुकसान होऊ शकते. दरम्यान, दुसरी घटना दावडी गावातील गाडगे वस्ती परिसरात घडली आहे. संततधार पावसामुळे येथेही चासकमान डाव्या कालव्याच्या भरावाला मोठे भगदाड पडले असून, परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कालव्याची भिंत व भराव कमकुवत झाल्याने भविष्यात आणखी नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. नुकसानाचा प्राथमिक आढावा घेतल्यानंतर लवकरात लवकर दुरुस्तीची कामे हाती घेण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. मात्र, केवळ पाहणी न करता तातडीने प्रत्यक्ष काम सुरू करावे, अशी ठाम मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
डावा कालवा म्हणजे शिरूर-खेडची जलवाहिनी!
चासकमान धरणाचा डावा कालवा हा शिरूर आणि खेड तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीला जीवनदायी पाणीपुरवठा करणारी प्रमुख जलवाहिनी आहे. अतिवृष्टीमुळे सातकरस्थळ आणि दावडी परिसरात पडलेल्या भगदाडांमुळे कालव्याच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तज्ज्ञांच्या माध्यमातून संपूर्ण कालव्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून ज्या ठिकाणी धोका आहे, त्या सर्व ठिकाणी तातडीने दुरुस्ती आणि मजबुतीकरणाची कामे हाती घेणे आवश्यक आहे.
वेळेत उपाययोजना न झाल्यास भविष्यात कालव्याला आणखी मोठे नुकसान होण्याची शक्यता असून, त्याचा थेट फटका शिरूर आणि खेड तालुक्यातील सिंचन व्यवस्था, खरीप व रब्बी हंगाम आणि हजारो शेतकऱ्यांना बसू शकतो. त्यामुळे पाटबंधारे विभागाने या प्रश्नाकडे अत्यंत गांभीर्याने पाहून त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.






