Palkhi Route: पालखी सोहळा २ दिवसांवर, यवतचा सेवा रस्ता खड्ड्यांत; वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Palkhi Route: संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तोंडावर स्टेशन रोड चौक ते चौफुलापर्यंत महामार्गाच्या साईडपट्ट्या धोकादायक अवस्थेत.

Palkhi Route : जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपला असताना यवत येथील पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतचा सेवा रस्ता आणि कासुर्डी ते चौफुलापर्यंत असणाऱ्या महामार्गाच्या साईडपट्ट्यावर देखील मोठमोठे खड्डे पडले आहे. हे खड्डे धोकादायक अवस्थेत आहे. मोठे खड्डे, साचणारे पाणी आणि सेवा रस्त्यावरच बेशिस्त वाहनतळामुळे नागरिकांसह वाहनचालकांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पालखी काळात लाखो वारकरी याच मार्गाचा वापर करणार असताना याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. पुण्याकडून यवतमध्ये प्रवेश करताना स्टेशन रोड चौक, श्री काळभैरवनाथ मंदिराजवळील पूल, मुख्य चौक, अलंकार ऑटोमोबाईल्स परिसरातील सेवा रस्त्यावर ते भांडगाव आणि चौफुला कडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या महामार्गच्या साईडपट्ट्यावर अनेक लहान-मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नाही.
परिणामी दुचाकीस्वारांसह इतर वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. यवत गावाला राष्ट्रीय महामार्गाशी जोडणारा हा प्रमुख सेवा रस्ता असल्याने येथे दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मात्र, खड्डे आणि रस्त्याच्या दुतर्फा वाहने यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. विशेषतः सकाळी व सायंकाळी एसटी बस, शालेय वाहने आणि इतर वाहनांना मार्ग काढताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहे. महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.
तात्पुरती डाजडुजी
स्थानिक नागरिकांच्या मते, पालखी सोहळ्यापूर्वी दरवर्षी सेवा रस्त्यावर तात्पुरती डागडुजी केली जाते; मात्र काही दिवसांतच रस्त्याची अवस्था पुन्हा पूर्ववत होते. त्यामुळे केवळ तात्पुरते उपाय न करता सेवा रस्त्याची दर्जेदार व कायमस्वरूपी दुरुस्ती करणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे.





