Pune FDA Raid: पुण्यात एफडीएची धडक कारवाई! मिठाई, वेफर्स, चकलीसह लाखो रुपयांचा भगर-साबुदाणा जप्त
Pune FDA Raid: पुणे जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची (FDA) मोठी कारवाई; बिबवेवाडी, मार्केट यार्ड आणि विविध ठिकाणच्या हॉटेल्स व खाद्यपदार्थ विक्रेत्यांची तपासणी.

Pune FDA Raid- अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे जिल्ह्यांत विविध आस्थापनांवर धडक कारवाई केली. या कारवाईत मिठाई, बनाना वेफर्स, चकली, भगर आणि साबुदाणा यांचा साठा तपासण्यात आला. संबंधित आस्थापनांमध्ये खाद्यरंगाचा अतिरिक्त वापर, निकृष्ट किंवा असुरक्षित अन्नपदार्थांचा संशय, व्यवसाय नोंदणीतील त्रुटी, प्रयोगशाळा चाचण्यांच्या नोंदींचा अभाव आणि लेबलिंग नियमांचे उल्लंघन आढळल्याची माहिती प्रशासनाने दिली.
पुण्यातील बिबवेवाडी येथील आशिष फूड्समधून २१० किलो बनाना वेफर्स, तर रेड्डी स्वीट हाउसमधून ७५.६ किलो चकलीचा साठा तपासण्यात आला. त्यांची किंमत अनुक्रमे २७ हजार ३०० रुपये आणि २५ हजार २०० रुपये आहे. या दोन्ही आस्थापनांमध्ये व्यवसाय नोंदणीतील त्रुटी, प्रयोगशाळा चाचण्यांच्या नोंदींचा अभाव आणि लेबलिंग नियमांचे उल्लंघन आढळले.
दरम्यान, पुण्यातील मार्केट यार्ड येथील समीर सेल्स या आस्थापनाची १३ ऑक्टोबर रोजी तपासणी करण्यात आली. येथे भगर आणि साबुदाणा असा एकूण चार हजार २९६ किलो साठा आढळला. या साठ्याची किंमत २३ लाख ६४ हजार ५८८ रुपये असल्याची माहिती देण्यात आली. संबंधित साठा निकृष्ट किंवा असुरक्षित असल्याचा संशय असून, लेबलिंग नियमांचे उल्लंघन झाल्याचेही निदर्शनास आले.
यासह पुण्यातील २५ ठिकाणच्या डाॅमिनरोज पिझ्झावर धाड टाकत तपासणी करण्यात आली. या दरम्यान स्वच्छतेविषयी गंभीर त्रुटी आढळून आल्याचे निष्पन्न झाल्याने कारवाई करण्यात आली. अन्नपदार्थांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि नियमांचे पालन याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी करण्यात येत आहे. संशयित अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत अंतिम निष्कर्ष काढण्यासाठी आवश्यकतेनुसार प्रयोगशाळा तपासणी व पुढील कायदेशीर प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.





