MNS Protest Pune: पुणेकरांच्या पाणीकपातीविरोधात मनसे आक्रमक; महापालिकेसमोर मटके फोडून प्रशासनाचा निषेध
MNS Protest Pune: शहरातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असताना आठवड्यातून एक दिवस पाणीकपात लादण्याच्या निर्णयाविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंदोलन.

MNS Protest Pune- धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असतानाही पुणेकरांवर आठवड्यातून एक दिवस पाणीकपात लादण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मटका फोड आंदोलन करण्यात आले. प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटींचा फटका सर्वसामान्य नागरिकांना का, असा सवाल करत पाणीकपातीचा निर्णय तातडीने रद्द करून शहराला नियमित आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याची मागणी मनसेने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
या मागणीसाठी पक्षाच्या वतीने महापालिका भवनासमोर गुरुवारी आंदोलन करण्यात आले. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असतानाही आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय अन्यायकारक असून, ही कपात मागे घेण्याची मागणी आंदोलकांनी केली. शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाणीकपातीचा परिणाम केवळ संबंधित दिवसापुरता मर्यादित राहात नाही. पाणीपुरवठा पूर्ववत होण्यासाठी पुढील दोन ते तीन दिवस लागतात. यादरम्यान नागरिकांना कमी दाबाने किंवा अपुऱ्या प्रमाणात पाणी मिळते. उंचावरील भागांमध्ये पाणी पोहोचत नसल्याच्या तक्रारी असून, नागरिकांना दैनंदिन गरजा भागविताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कपात करण्याऐवजी वितरण व्यवस्थेतील पाण्याचा अपव्यय रोखणे आणि योग्य नियोजन आवश्यक आहे. पावसाळ्यात अतिरिक्त पाणी सोडण्यापासून ते पाणीकपातीचा निर्णय घेण्यापर्यंतच्या प्रक्रियेचा प्रशासनाने आढावा घ्यावा. पाण्याची बचत, प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर, बांधकामांसाठी पर्यायी पाण्याची उपलब्धता आणि धरणातील पाण्याचे योग्य नियोजन या उपाययोजनांवर भर द्यावा, अशीही मागणी करण्यात आली.





