Pune Election Results : मुळशीत ‘घड्याळा’चा गजर! राष्ट्रवादीचे वर्चस्व, पण भाजपचा ‘हा’ मोठा विजय; वाचा सविस्तर निकाल
Pune Election Results : मुळशी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी; जिल्हा परिषदेच्या २ जागांसह पंचायत समितीवरही वर्चस्व, तर भाजपचे ऐतिहासिक खाते.

Pune Election Results – जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मुळशी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाचा गजर पाहायला मिळाला. पौड-अंबडवेट जिल्हा परिषद गटावर दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे वर्चस्व दिसून आले. पौड-अंबडवेट जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद नंदकुमार वाळंज हे विजयी झाले. तर पिरंगुट-भूगाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे शांताराम इंगवले विजयी झाले. माण-हिंजवडी जिल्हा परिषद गटातून भाजपचे शिवाजी बुचडे हे विजयी झाले.
जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी शनिवारी 63.93 टक्के मतदान झाले होते. आज सकाळी दहा वाजल्यापासून कासारआंबोली येथील राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत मतमोजणी प्रक्रिया पार पडली. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या पिरंगुट-भूगाव जिल्हा परिषद गटात पंचरंगी लढत झाली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शांताराम इंगवले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून महादेव कोंढरे,
भाजपकडून भानुदास पानसरे, शिवसेनेकडून भाऊ मरगळे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून आबासाहेब शेळके हे उमेदवार रिंगणात होते. या गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे शांताराम इंगवले हे 1,384 मतांनी विजयी झाले.पौड-अंबडवेट जिल्हा परिषद गटात भाऊ आखाडे (शिवसेना धनुष्यबाण), ज्ञानेश्वर आखाडे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तुतारी), विनायक ठोंबरे (भाजप कमळ), रमेश पानसरे (काँग्रेस हाताचा पंजा), अविनाश बलकवडे (शिवसेना उबाठा मशाल) आणि मिलिंद वाळंज (राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ) हे उमेदवार रिंगणात होते.
या गटात अविनाश बलकवडे आणि मिलिंद वाळंज यांच्यात मुख्य लढत झाली. अखेर मिलिंद वाळंज हे 5,297 मतांनी विजयी झाले.मुळशी पंचायत समितीच्या एकूण सहा जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने तीन, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दोन तर भाजपने एका जागेवर विजय मिळवला. पौड गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या काजल मोरे या 2,145 मतांनी विजयी झाल्या. अंबडवेट गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण धनवे हे 1,776 मतांनी विजयी झाले.
माण गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंदा शेळके या 1,310 मतांनी विजयी झाल्या. पिरंगुट गणातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुल पवळे हे 363 मतांनी विजयी झाले. भूगाव गणातून शरदचंद्र पवार पक्षाचे दगडू करंजावणे हे 438 मतांनी विजयी झाले. हिंजवडी गणातून भाजपच्या ऐश्वर्या वाघमारे या 1,322 मतांनी विजयी झाल्या.
राष्ट्रवादी 2, भाजप 1
मुळशी तालुक्यातील जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तर भाजपचा एक उमेदवार विजयी झाला आहे. पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दोन आणि भाजपचा एक उमेदवार विजयी झाला असून मुळशी पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व निर्माण झाले आहे. मुळशी तालुक्यात प्रथमच जिल्हा परिषद व पंचायत समितीत भाजपने खाते उघडले आहे. शिवसेना उबाठा, शिवसेना (धनुष्यबाण) आणि काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही.






