Sangram Thopte – नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या भाजपा व शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांचा नागरी सत्कार सोहळा मुळशीचे माजी सभापती पांडुरंग ओझरकर युवा मंच व माण ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामपंचायत सभागृहात करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले माजी आमदार संग्राम थोपटे म्हणाले, आमचं ठरलंय…मुळशी पंचायत समितीचा सभापती हा महायुतीचाच होईल. कारण कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने मुळशीचा सभापती चिठ्ठीने होईल किंवा बहुमताने होईल. शासनाने सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर याबाबत अधिकची स्पष्टता येईल. असे सूचक वक्तव्य करत राजकीय चर्चांना उधाण आणले. ते पुढे म्हणाले शेतकऱ्यांच्या जमिनीवर भूसंपादनाचे पडलेले एमआयडीसी व कॅनॉलचे शिक्के काढणे, वाढत्या नागरीकरणामुळे या भागातील सोसायट्यांच्या वीज, पाणी, रस्ते व कचरा व्यवस्थापन या समस्या सोडवण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे निश्चित पाठपुरावा करू. निवडणुकीत या भागांतील मतदारांनी टाकलेल्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही. याप्रसंगी माण हिंजवडी गटातून विजयी झालेले भाजपाचे सदस्य शिवाजीराव बुचडे पाटील, हिंजवडी गणातून विजयी झालेल्या भाजपाच्या उमेदवार ऐश्वर्या वाघमारे, पिरंगुट गणातून विजयी झालेले राहुल पवळे व भूगाव गणातून विजयी उमेदवार दगडू करंजावणे तसेच भोरचे जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सुके यांचा नागरी सत्कार करण्यात आला. मुळशी पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार सोहळा. यावेळी माजी सभापती पांडुरंग ओझरकर, माण ग्रामपंचायतीच्या सरपंच अर्चना आढाव, मुळशी तालुका भाजपाचे अध्यक्ष हनुमंत चव्हाण ,भाजप नेते सुरेश हुलावळे, गंगाराम मातेरे ,दादाराम मांडेकर,संतोष मोहिते, पांडुरंग राक्षे, अमृता हिंगडे, आनंदा घोगरे, माजी उपसरपंच शशीकांत धुमाळ, सुनील भरणे,बापूसाहेब पारखी,युवा नेते सचिन आढाव,निलेश भोईर, युवा मोर्चाचे कार्याध्यक्ष प्रसाद खानेकर,मोरेश्वर घारे, साहेबराव जाधव, राहुल जाधव, युवराज पायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्तविक प्रसन्न ओझरकर यांनी तर आभार रवी बोडके यांनी मानले.यावेळी संतोष मोहिते यांनी सांगितले की माण गाव ज्या पक्षाच्या मागे उभे राहते त्यांचा विजय निश्चित होतो, असा इतिहास आहे. विद्यमान आमदारांनी माणच्या प्रलंबित प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याने माणगाव राष्ट्रवादीला सोडून भाजपाच्या मागे खंबीरपणे उभे राहून भाजपला मोठे मताधिक्य दिले. त्यामुळे माजी आमदार थोपटे व नवनिर्वाचित सदस्यांची जबाबदारी आता वाढली असून माणच्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली. त्यांची उपस्िथती चर्चेचा विषय.. भाजप कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या जाहीर सत्कार समारंभाला शरद पवार गटाचे दोन्ही सदस्य उपस्थित राहून त्यांनी सत्कार स्वीकारल्याने मुळशीत नवीन राजकिय समीकरणे जुळणार की काय हा चर्चेचा विषय बनला. त्यामुळे शरद पवार गटाच्या पाठींब्यावर भाजपचा एकमेव सदस्य सभापती पदावर दावा करणार की काय ? अशा चर्चा सुरू झाल्या. याला संग्राम थोपटे यांच्या ” आमंच ठरलंय” या सूचक वक्तव्याने पुष्टी दिल्याने राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय बनला आहे.