Baramati Election Results : बारामतीत राष्ट्रवादीची ‘क्लीन स्वीप’! अजितदादांचा बालेकिल्ला अभेद्य, भाजप-सेनेचा सुपडा साफ
Baramati Election Results : दादांच्या शिस्तीचे कार्यकर्त्यांकडून पालन; विजयी मिरवणूक न काढता बारामतीत राष्ट्रवादीचा सर्व जागांवर विजय.

Baramati Election Results – राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बारामतीत जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व कायम राखले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पहिल्यांदा झालेल्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जिल्हा परिषदेच्या सहापैकी सहा जागांवर तर पंचायत समितीच्या १० गणात राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत विजय संपादन केला. पंचायत समितीतील सुपे व शिर्सुफळ गणात भाजपच्या उमेदवारांनी विजय संपादन केला.
या दोन्ही जागेवर राष्ट्रवादीने उमेदवारी दिली नव्हती. राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार म्हणूनच या भाजपच्या दोन्ही उमेदवारांची चर्चा होती. त्यामुळे सर्व जागांवर विजय संपादन करण्यात राष्ट्रवादी यशस्वी ठरली.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरोधात भाजप, बसपा तसेच शिवसेना, मनसे हे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. काही जागा वगळता भाजपाने सर्व ठिकाणी उमेदवार दिले होते. तर बसप व शिवसेना, मनसेने काही ठिकाणी उमेदवार उभे केले होते.
मात्र, (स्व) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर कोणीही प्रचार यंत्रणा राबवली नाही. राष्ट्रवादीच्या बाजूने सहानुभूतीची लाट तयार झाली होती. बारामतीकरांवर दुःखाचे सावट होते. त्यामुळे मतदानादिवशी देखील मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले होते. यंदा बारामतीत मतदानाचा टक्का त्यामुळे घसरला होता.
एकूण ५४.९० टक्के मतदान झाले. सोमवार सकाळी (दि.९) रोजी दहा वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी विजयी आघाडी घेण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादीचा हा विजयी झंझावात कायम राहिला. दुपारी दोन वाजता चित्र स्पष्ट झाले. भाजप, शिवसेना, बसपा यांचा निवडणुकीत सुपडा साफ झाला आहे.
पंचायत समितीत दोन जागा भाजपला
बारामती तालुक्यात राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळाली. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती तालुक्यात पार पडणारी ही जिल्हा परिषद व पंचायत समितीची गेल्या 40 वर्षांतील पहिलीच निवडणूक ठरली. त्यांच्या निधनामुळे कोणत्याही पक्षाने प्रचार सभा न घेता निवडणूक प्रक्रिया पार पडली. प्रचारसभांशिवाय पार पडलेली ही बारामतीच्या इतिहासातील पहिलीच निवडणूक ठरली आहे.
बारामतीत जिल्हा परिषद गटाच्या सहाची सहा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला यश आले आहे. पंचायत समिती गणाकरिता राष्ट्रवादी अजित पवार गटाने भाजपाला सुपा गणातून एक जागा तर शिर्सुफळ गणातून एक जागा सोडली होती. दहा जागांवर अजित पवार गटाचे उमेदवार उभे केले होते. सर्व जागांवरील उमेदवार विजयी झाले आहेत.
कुठेही जल्लोषी मिरवणूक नाही
राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये बारामतीत वर्चस्व कायम राखत दणदणीत विजय संपादित केला. तरी अजित पवार यांच्या निधनामुळे कोणत्याही प्रकारचा जल्लोष राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला नाही. शांत, संयमी व शिस्तबद्ध पद्धतीने हा विजय स्वीकारला आहे. मिरवणूक अथवा गुलालाची उधळण तालुक्यात कुठेही झाली नाही. अजित पवार यांनी घालून दिलेल्या शिस्तबद्धपणाचे पालन कार्यकर्त्यांनी तंतोतंत केले आहे.





