Mulshi News – मुळशी तालुक्यातील धर्मादाय रुग्णालयांच्या कामकाजाचा आढावा घेत पंचायत समिती मुळशी येथे झालेल्या बैठकीत स्थानिक रुग्णांना प्राधान्याने उपचार, बेड व रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. मंगळवारी पार पडलेल्या या बैठकीस विविध रुग्णालयांचे प्रतिनिधी, पदाधिकारी तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तालुक्यात मोठ्या रुग्णालयांची कमतरता जाणवत असली तरी सिम्बॉयसिससारखे मोठे रुग्णालय उपलब्ध असल्याने त्यांनी स्थानिक नागरिकांना प्राधान्य द्यावे, तसेच आयुष्यमान भारतसह विविध शासकीय योजनांचा लाभ अधिकाधिक रुग्णांपर्यंत पोहोचवावा, असे निर्देश देण्यात आले. तसेच रुग्णवाहिका सेवा केवळ 5 किलोमीटर मर्यादेत न ठेवता गरजेनुसार तत्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले. लवळे फाटा येथील मुळशी स्पेशालिटी हॉस्पिटल व भुगाव येथील लाईफ लाईन हॉस्पिटल यांनाही शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले. मुळशी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बिलांबाबत तक्रारी आल्याने अवाजवी शुल्क आकारू नये, असा इशाराही बैठकीत देण्यात आला. याशिवाय सर्व रुग्णालयांनी दररोज उपलब्ध व भरलेल्या बेडची माहिती दर्शनी फलकावर लावावी, असे स्पष्ट करण्यात आले. या बैठकीस सभापती मंदा बाबाजी शेळके, उपसभापती दगडूकाका करंजावणे, जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले, पंचायत समिती सदस्य प्रवीण धनवे, राहुल पवळे, काजल अंकुश मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वामन गेंगजे, विविध धर्मादाय रुग्णालयांचे डॉक्टर, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिरिक्त बिलांबाबत तक्रारी बैठकीदरम्यान काही ग्रामस्थांनी मुळशी स्पेशालिटीसह इतर रुग्णालयांवर अवाजवी बिल आकारण्याचा आरोप केला. शासकीय योजनांची अंमलबजावणी पारदर्शक नसल्याची तसेच रुग्णांना त्रास दिला जात असल्याची तक्रार करण्यात आली. या प्रकरणी पंचायत समिती कोणती ठोस कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.