Indapur Election Results : इंदापूर तालुक्याला ‘वजनदार’ खुर्चीची चाहूल! भरणे-पाटील एकत्र अन् राष्ट्रवादीचा ‘क्लीन स्वीप’
Indapur Election Results : दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या ऐतिहासिक एकजुटीमुळे पुणे जिल्हा परिषदेच्या सत्तेची चावी आता इंदापूरच्या हाती.

Indapur Election Results – तालुक्याच्या राजकारणात दशकानुदशके दिसलेले वैर अखेर विकासाच्या मुद्द्यावर वितळले आणि त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसची अभूतपूर्व लाट उसळली. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र येत ‘विकास प्रथम’चा मंत्र दिला. दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या विचारांची शपथ घेत या दोन्ही नेत्यांनी गुण्यागोविंदाने काम केल्याचे चित्र तालुक्याने अनुभवले-आणि निकालात त्याचेच प्रतिबिंब उमटले.
जिल्हा परिषदेच्या आठही जागा आणि पंचायत समितीच्या सोळाही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विक्रमी मताधिक्याने विजय मिळवत इंदापूरचा राजकीय इतिहासच पालटला. तालुका अक्षरशः राष्ट्रवादीमय झाला असून, पुणे जिल्हा परिषदेची सत्ता एकहाती स्थापन करण्यासाठी पक्षाच्या हालचालींना वेग आला आहे. अजितदादांच्या निर्वाणानंतर त्यांच्या विचारांभोवती एकवटलेल्या इंदापूरने दिलेला हा कौल ‘विकासाच्या राजकारणा’चा ठसा उमटवणारा मानला जात आहे.
यंदाच्या निवडणुकीत दहा हजारांहून अधिक मताधिक्य मिळवणारे सदस्य म्हणून यशराज जगदाळे, अंकिता पाटील ठाकरे, माधुरी भिसे, निर्मला मिसाळ, हर्षदा जाधव, सोनाली जाधव, श्रीमंत ढोले यांच्यासह जवळपास सर्वच विजयी सदस्यांनी दमदार आघाडी घेतली. या भव्य विजयामागे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे आणि नगराध्यक्ष भरत शहा यांचे सूक्ष्म नियोजन,
कार्यकर्त्यांची एकजूट आणि सर्व घटकांना सत्तेत समान संधी देण्याची रणनीती कारणीभूत ठरल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.आता जिल्हा परिषदेत इंदापूरच्या आठ विजयी सदस्यांपैकी एका सदस्याला महत्त्वाच्या खात्याचे सभापतीपद मिळण्याचे संकेत स्पष्ट झाले आहेत. जिल्ह्यातील सत्तासमीकरणात इंदापूरचा वाटा निर्णायक ठरणार असल्याने ‘वजनदार’ खुर्ची तालुक्याच्या वाट्याला येणार, अशी चर्चा रंगली आहे. याबाबत अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी व स्थानिक नेतृत्व घेणार असले तरी इंदापूरच्या ताकदीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
एकीचे गिफट
राजकीय विश्लेषकांच्या मते, भरणे-पाटील यांची ऐतिहासिक एकजूट ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून विकासाभोवती फिरणार्या नव्या समीकरणांची सुरुवात आहे. दिवंगत अजितदादा पवार यांनी दिलेला शब्द पाळत तिन्ही नेत्यांनी दाखवलेली एकीच आता इंदापूरच्या राजकीय भवितव्याला नवा वेग देणार आहे. जिल्हा परिषदेत मिळणारी जबाबदारी ही त्या एकीचे ‘गिफ्ट’ ठरेल, अशी जोरदार चर्चा राज्यभर रंगू लागली आहे.






