पुणे – ‘पूर्णम् इकोव्हिजन फाऊंडेशन’तर्फे रविवारी (दि.१७) कर्वेनगर येथील कमिन्स इंजिनिअरिंग महाविद्यालयातील मेकॅनिकल ऑडिटोरिअममध्ये ‘पर्यावरण मित्र’ व ‘पर्यावरण हितवर्धिनी’ हे पुरस्कार देऊन मान्यवरांना गौरविण्यात येणार आहे. पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध उद्योजकांना यानिमित्ताने एक हक्काचे असे व्यासपीठ मिळावे याकरिता ‘इको-मेला’ हा कार्यक्रम ही होणार आहे.
‘पूर्णम् इकोव्हिजन फाऊंडेशन’ ही सामाजिक संस्था २०१२ पासून पर्यावरण आणि कचरा व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. पर्यावरण आणि कचरा व्यवस्थापन या पर्यावरणीय विषयामध्ये काम करण्यात अग्रेसर असणाऱ्या संस्थेच्या कार्याचा आढावा आणि समाजातील पर्यावरणीय समस्यांवर काम करण्यासाठी प्रोत्साहनपर कार्यक्रमांचे आयोजन ‘पूर्णम’ दरवर्षी वर्धापन दिनानिमित्ताने करत असते. यंदाही पूर्णम् इकोव्हिजन फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश मणेरीकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.
समाजातील पर्यावरणीय समस्यांवर काम करण्यासाठी प्रोत्साहनपर विविध कार्यक्रमांचे आयोजन ‘पूर्णम’ दरवर्षी करत आलेली आहे. याचाच भाग म्हणून २०२० पासून निवासी सोसायटीसाठी ‘पर्यावरण हितवर्धिनी’ व पर्यावरण संवर्धनासंबंधित काम करणाऱ्या तरुण उद्योजक, व्यावसायिकांसाठी ‘पर्यावरण मित्र’ असे दोन पुरस्कार दरवर्षी देण्यात येतात. यावर्षीचा ‘पर्यावरण हितवर्धिनी’ हा पुरस्कार बावधन येथील ‘पेबल्स – २’ गृहनिर्माण संस्थेला देणार असून ‘पर्यावरण मित्र’ हा पुरस्कार ‘गो डू गुड’ संस्थेच्या संस्थापक खुशबू गांधी यांना देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने यावर्षी सामाजिक शोधकर्ते व अभ्यासक, योजक या संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेचे संस्थापक आणि नेतृत्व विकास प्रशिक्षण विषयात काम करणारे डॉ. गजानन डांगे यांचे मार्गदर्शनही होणार आहे. पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध उद्योजकांना यानिमित्ताने एक हक्काचे असे व्यासपीठ मिळावे याकरिता ‘इको-मेला’ हा कार्यक्रम ही होणार आहे. यावर्षीचा ‘इको-मेला’ दु. ४ ते सायं ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुला असणार आहे.