बेल्हे -जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थांनी आपली संस्कृती, आपला अभिमान या कार्यक्रमा अंतर्गत जुन्या ऐतिहासिक वस्तूंचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले होते. याचे उद्घाटन शिवनेरी भूषण माजी सैनिक रमेश खरमाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
“जुनं ते सोन’ या अंतर्गत शेकडो वर्षापूर्वीची शेतीची अवजारे, स्वयंपाक घरातील वस्तू, जुनी नाणी, घरातील वापराच्या वस्तू या प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. यामध्ये मुसळ, जातं, चिमणी, कंदील, दगडी दिवा, अडकित्ता, काठवट, रवी, जुना रेडिओ, टेप रेकॉर्डर, टेलिफोन, चोपणी, घोंगडी, घंगाळ, धान्य मोजण्याची आठवा, अधुली, चामड्याची चप्पल, जुनी नाणी, पितळी ताट, वाटी, चमचा, तांब्या, कळशी, हंडा, पितळी डब्बे, बैलांच्या घुंगरमाळा, मुसक, चाबूक, विळी, कुडाची आंघोळीची नाहणी, देव्हारा, अशा अनेक वस्तू या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या.
विद्यार्थांनी बनवलेल्या चित्रकला हस्त कलाचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यात विद्यार्थांनी निसर्ग चित्र, शॅडो पेंटिंग, डिझाईन वर्क, स्मरण चित्र, कोलाज, ग्लास पेंटिंग, पिओपी मॉडेल आदी हस्तकला मांडण्यात आल्या. संस्थापक सी. ए. सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे, विश्वस्त दावला कणसे, प्राचार्या विद्या गाडगे व संचालक मंडळांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.