Pune crime : पीएसआय कामठेचा माझ्या शरीराला विकृतपणे स्पर्श; तरुणीच्या आरोपाने पुणे पोलीस अडचणीत?

पुणे : पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तीन दलित तरुणींवर शारीरिक, मानसिक आणि लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाने पुणे पोलिसांच्या कार्यशैलीवर आणि दलित समाजावरील अन्यायावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पीडित तरुणींनी आपल्या तक्रारीत कोथरुड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा कामठे, कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे, सायबर पोलीस सानप आणि एका पिवळ्या चेक शर्टातील अज्ञात पोलीस कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत.
या तरुणींना छत्रपती संभाजीनगर येथील एका विवाहित महिलेच्या बेपत्ता प्रकरणाच्या तपासासाठी कोथरुड पोलीस ठाण्यात आणले होते, जिथे त्यांचा सुमारे चार तास छळ झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणाने सामाजिक आणि राजकीय स्तरावर खळबळ उडवली असून, पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
या प्रकरणातील पीडित तरुणी कोथरुड येथील एका फ्लॅटमध्ये राहत होत्या. त्यांनी आपल्या एका विवाहित मैत्रिणीला आश्रय दिला होता. ३ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता कोथरुड पोलिस आणि छत्रपती संभाजीनगरचे पोलीस, तसेच त्या मैत्रिणीचे निवृत्त पोलीस असलेले सासरे, त्यांच्या फ्लॅटवर आले.
त्यांनी फ्लॅटची झाडाझडती घेतली आणि दोन तरुणींना कोणत्याही लेखी नोटिशीविना कोथरुड पोलीस ठाण्यात नेले. तिथे त्यांना सायंकाळी ७:३० वाजेपर्यंत ठाण्याच्या वरच्या मजल्यावरील एका खोलीत डांबून ठेवण्यात आले.
दरम्यान, पीडित तरुणींनी तक्रारीत गंभीर आरोप केले आहेत. कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांनी “तू महार-मांगाची आहेस, रांड आहेस, किती मुलांसोबत झोपलीस?” अशा जातीवाचक आणि अपमानास्पद शिवीगाळ केल्या. पोलिसांनी तरुणींची जात वारंवार विचारली आणि नाव सांगितल्यावर हसून त्यांचा अपमान केला.
तसेच कॉन्स्टेबल शिंदे यांनी तरुणींच्या वैयक्तिक आयुष्यावर टिप्पणी केली. “एकट्या राहता, मोकाट सुटलाय, किती पोरांसोबत झोपते?”, “तुझी आणि तुझ्या मैत्रिणीची ओढणी एकाच रंगाची आहे, तुम्ही लेस्बियन दिसता”, “तुम्ही LGBTQ कम्युनिटीच्या आहात.” अशा टिप्पण्यांनी तरुणींचा शाब्दिक लैंगिक छळ केला. तरुणींना गालावर, पाठीवर गुद्दे आणि चापट्या मारल्या, तसेच कमरेत आणि पायावर लाथा मारल्या.
शरीराला विकृतपणे स्पर्श
पीएसआय प्रेमा कामठे यांनी एका तरुणीच्या शरीराला विकृतपणे स्पर्श केला. तक्रारीत म्हटले आहे की, “पीएसआय कामठे माझ्या अंगावर आल्या, त्यांच्या हातांचा, खांद्याचा, हनुवटीचा घाणेरडा आणि विकृत स्पर्श मला जाणवला.” पुरुष पोलिसांनीही तरुणींच्या शरीराला डोळ्यांनी “स्कॅन” केल्याचा आरोप आहे.
मस्त मजा करते, ऐष करते
पोलिसांनी तरुणींच्या मोबाइलमधील खाजगी चॅट, व्हॉईस नोट्स आणि फोटो तपासले. “मस्त मजा करते, ऐष करते” अशा टिप्पण्या करत त्यांनी तरुणींच्या वैयक्तिक आयुष्याचा अपमान केला. “या दोघांमधला तुझा बॉयफ्रेंड कोण?” असे प्रश्न विचारून मानसिक छळ केला.
गुन्हा दाखल करण्याची मागणी
तरुणींनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र, कोथरुड पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार देत सात पानी पत्र दिले, ज्यामध्ये “ही घटना सार्वजनिक ठिकाणी घडली नसल्याने ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होऊ शकत नाही” असे नमूद केले.





