Pune Crime : औंधमध्ये महिलेचे मंगळसूत्र हिसकावणारा सराईत चोर जेरबंद
Pune Crime : २५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या तपासातून आरोपीचा माग; ७० हून अधिक जबरी चोरीचे गुन्हे

Pune Crime : औंध परिसरात पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून पळ काढणाऱ्या सराईत चोरट्याला चतुःश्रृंगी पोलिसांनी जेरबंद केले. सलग दहा दिवस २५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून पोलिसांनी आरोपीचा माग काढला. त्याच्याकडून चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल आणि हिसकावलेले मंगळसूत्र असा एकूण तीन लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राजाभाऊ ऊर्फ राजू खेमू राठोड (वय ४४, रा. आर्वी गाव, साई रोड, जिल्हा लातूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, लातूर, नाशिक शहर आणि सातारा येथे ७० हून अधिक जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
२० ऑक्टोबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास औंध परिसरातून एक महिला पायी जात होती. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी औंध, पाषाण, बाणेर, बावधन, कोथरूड, सूस, लवळे, धायरी, नानापेठ आणि हडपसर परिसरातील २५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. सलग दहा दिवस तपास करून आरोपीची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर परिसरातून पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले.
तपासादरम्यान आरोपीने गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत आणि सहायक पोलीस आयुक्त ब्रह्मदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, पोलीस निरीक्षक शितल जाधव यांच्या सूचनांनुसार सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे करीत आहेत.





