Pune Crime: दगडूशेठ दर्शनासाठी निघालेल्या दाम्पत्याला लुटले! पोलिसांनी काही तासांत टोळीच्या मुसक्या आवळल्या
Pune Crime: अंगारकी संकष्टीनिमित्त खेड शिवापूरहून दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनासाठी येणाऱ्या दाम्पत्याला कात्रज बोगद्यात अडवून मंगळसूत्र लांबवले.

Pune Crime- अंगारकी संकष्टीनिमित्त खेड शिवापूर येथून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी निघालेल्या दुचाकीस्वार दाम्पत्याला टोळक्याने लुटले. ही घटना मंगळवारी (दि. २९) पहाटे साडेचारला कात्रज बोगद्यातील दुसर्या वळणावर घडली आहे. याप्रकरणी टोळक्याला आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे.
तौहिद असला शहा (वय २३ ) सुलेमान यासिन शेख वय २१ ) रोहित बबलुसिंग (वय २० तिघेही, रा. पिंपरी) यांना अटक केली आहे. याप्रकरणी खेड शिवापूर परिसरात राहणार्या ४६ वर्षीय नागरिकाने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार खेड शिवापूरला राहायला असून, मंगळवारी पहाटे दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी पत्नीसह दुचाकीवर जात होते.
त्यावेळी कात्रज बोगद्यातील दुसर्या वळणावर टोळीने त्यांना अडवले. त्यांच्या दुचाकीची चावी काढून घेत पत्नीच्या गळ्यातील १ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांच्या पथकाने तात्काळ चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे तपास करीत आहेत.





