Valet Parking: व्हॅलेट पार्किंगच्या आडून वरकमाईचा फंडा! महापालिकेची जागा मोफत वापरण्याचा प्रकार
Valet Parking: पुण्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट्सकडून व्हॅलेट पार्किंगच्या नावाखाली अंतर्गत रस्ते व सार्वजनिक जागांवर बेकायदेशीर वाहन पार्किंग.

Valet Parking- हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांसाठी व्हॅलेट पार्किंगची सुविधा देण्याच्या नावाखाली महापालिकेच्या अंतर्गत रस्त्यांवरच वाहने पार्क करून त्यातून पैसे कमावण्याचा प्रकार शहरातील अनेक भागांत सर्रास सुरू आहे. हॉटेलचालक अथवा त्यांच्याकडून नियुक्त केलेल्या व्हॅलेट पार्किंग एजन्सी ग्राहकांकडून पार्किंगच्या नावाखाली अप्रत्यक्ष शुल्क आकारतात.
मात्र, ग्राहकांची वाहने पार्क करण्यासाठी महापालिकेच्या रस्त्यांचा वापर केला जात असल्याने सार्वजनिक जागेचा खासगी व्यावसायिक वापर होत असल्याचे चित्र आहे. शहरातील अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये वाहनतळासाठी राखीव असलेल्या फ्रंट मार्जिन, साइड मार्जिन, तसेच बेसमेंटचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केला जात असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी या जागांवर टेबल- खुर्च्या लावून ग्राहकांसाठी व्यवस्था केली जाते.
त्यामुळे हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची वाहने पार्क करण्यासाठी परिसरातील अंतर्गत रस्ते, छोट्या गल्ल्या आणि इतर सार्वजनिक जागांचा वापर केला जातो. हॉटेलचालकांकडून व्हॅलेट पार्किंगसाठी स्वतंत्र एजन्सी नियुक्त केली जाते. त्यासाठी त्यांच्याकडूनच सुरक्षा रक्षक, तसेच कर्मचारी नेमले जातात. ही एजन्सी ग्राहकांची वाहने ताब्यात घेऊन ती आसपासच्या रस्त्यांवर किंवा छोट्या गल्ल्यांमध्ये पार्क करते.
त्यासाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र, ही वाहने संबधित हाॅटेलच्या जागेत न लावता ती रस्त्यावरच पार्क केली जातात. त्यासाठी या एजन्सी हाॅटेल व्यावसायिकाकडून शुल्क आकारते, तर पार्किंगसाठी मान्य असलेली जागा हाॅटेल चालकाला व्यावसायासाठी मिळत असल्याने त्याचाही फायदा होतो. मात्र, हे पार्किंग रस्त्यावर झाल्याने वाहनांना अडथळ्यांचा सामना करावा लागतो.
थोडक्यात महापालिकेचे रस्ते मोफत वापरून खासगी एजन्सी आणि हॉटेलचालक पार्किंगच्या माध्यमातून पैसे कमावत आहेत. यामुळे परिसरातील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. छोट्या गल्ल्यांमध्ये मोठ्या संख्येने वाहने उभी राहिल्याने नागरिकांना त्यांच्या सोसायट्यांमधून वाहने बाहेर काढणे, स्वतःची वाहने पार्क करणे, तसेच आपत्कालीन वाहनांना मार्ग मिळणेही अडचणीचे ठरते.
कारवाईच्या मागणीचा प्रस्ताव
पार्किंगच्या नावाखाली महापालिकेच्या रस्त्यांचा वापर करणाऱ्या हॉटेलचालक आणि संबंधित एजन्सींवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर आणि रोहिणी चिमटे यांनी शहर सुधारणा समितीत दाखल केलेल्या प्रस्तावाद्वारे केली आहे. हॉटेलच्या फ्रंट मार्जिन, साइड मार्जिन आणि बेसमेंटचा व्यावसायिक वापर होत असल्यास त्याचीही तपासणी करून संबंधितांवर कारवाई करावी,
अशीही मागणी केली आहे. हॉटेलचा परिसर, उपलब्ध पार्किंगची क्षमता आणि व्हॅलेट पार्किंगची व्यवस्था यानुसार संबंधित हॉटेलचालक, तसेच पार्किंग एजन्सीकडून महापालिकेने निश्चित पार्किंग शुल्क आकारावे, अशी मागणीही खर्डेकर आणि चिमटे यांनी केली आहे.






