Pune News: अभिनेत्रीच्या फार्महाऊसचा वीजपुरवठा तोडला! लोणावळ्यात महावितरणची धडक कारवाई
Pune News: स्थानिक कर्मचाऱ्यांनी वारंवार विनंती करूनही बिल न भरल्याने महावितरणची नियमानुसार कारवाई; अखेर ३० सप्टेंबरला बिल भरल्यानंतर वीज सुरू.

Pune News- थकीत वीजबिलामुळे अभिनेत्री तनिषा मुखर्जी यांच्या लोणावळा येथील फार्महाऊसचा २६ सप्टेंबर रोजी खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा बुधवारी (दि. ३०) वीजबिल भरल्यानंतर महावितरणने पूर्ववत करण्यात आला. लोणावळा येथील फार्महाऊससाठी अभिनेत्री तनिषा मुखर्जी यांच्या नावावर महावितरणची तीन फेजची वीजजोडणी आहे. मोठ्या परिसरात असलेल्या या फार्महाऊसचे वीजमीटर प्रवेशद्वारापासून ३०० फूट अंतरावर आहे.
प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक तैनात असल्याने मीटर रीडिंगसाठी तेथील व्यवस्थापकाची (केअरटेकर) परवानगी घ्यावी लागते. मुखर्जी यांनी जुलै २०२६ चे वीजबिल ५ ऑगस्ट रोजी भरले होते. जुलैनंतर ऑगस्ट व सप्टेंबर अशा दोन महिन्यांची देयके तयार झाली. ऑगस्ट महिन्याची वीजबिल भरण्याची मुदत ४ सप्टेंबर रोजी संपली. त्यानंतर नियमानुसार मुखर्जी यांचे नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर वीजबिलाची नोटीस एमएसएसद्वारे देण्यात आली.
१९ सप्टेंबर रोजी नोटिशीची मुदत संपल्यानंतरही तेथील व्यवस्थापकास वीजबिल भरण्याची विनंती स्थानिक वीज कर्मचाऱ्यांनी वारंवार केली. तरीही वीजबिल न भरल्याने शेवटी महावितरणने नियमानुसार २६ सप्टेंबर रोजी वीजपुरवठा खंडित केला. बुधवारी (दि. ३०) दुपारी मुखर्जी यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून ३००० हजार रुपये देयक भरले. त्यानंतर महावितरणने तातडीने वीजपुरवठा पूर्ववत केला.





