पुणे : आद्यक्रांतीगुरू लहुजींचे कार्य दीपस्तंभासारखे – कुलगुरू डॉ सुरेश गोसावी

पुणे – आद्यक्रांतीगुरू लहुजींसारख्या लढवय्या गुरूंनी एकापेक्षा एक शूरवीर क्रांतिकारकांची फळी निर्माण करत त्यांना स्वराज्यासाठी बलिदानाला सिध्द केले. त्यांनी कुस्ती, बलोपासाना व शस्त्र प्रशिक्षणाबरोबरच विविध शस्त्रे तयार केली. यावरून त्यांची दूरदृष्टी आणि थोरपण दिसते. खरेतर त्यांचे कार्य दीपस्तंभासारखे होते, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाच्या वतीने आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्तादांच्या २३० व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ते बोलते होते. यावेळी जाधवर शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, प्रा.डॉ.सदानंद भोसले, प्रसाद फाटक व अध्यासन प्रमुख डॉ सुनील भंडगे उपस्थित होते.
समाजमनात क्रांतीची मशाल पेटवणारे, भारताच्या १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी व प्रामुख्याने लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके, महात्मा फुले, चाफेकर बंधू अशा हजारो क्रांतिकारकांना घडविणारे लहुजी वस्ताद साळवे हे महान देशभक्त होते. जगेल तर स्वराज्यासाठी अन मरेन तर स्वराज्यासाठी अशी शपथ घेत त्यांनी जनतेच्या मनामध्ये त्वेष तयार करून इंग्रजांविरुद्ध कडवी झुंज दिली. लहुजी खऱ्या अर्थाने क्रांतिकारकांचे स्फूर्तिस्थान होते’, अशा शब्दांत प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर यांनी लहुजींना आदरांजली वाहिली.
या कार्यक्रमातच लोकशाहीर अण्णा भाऊ वाङ्मय पुरस्कार डॉ.गोसावी यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ’ या ग्रंथासाठी प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, अण्णा भाऊंच्या गाजलेल्या ‘चित्रा’ कथासंग्रहाच्या हिंदी अनुवादासाठी प्रा.डॉ.सदानंद भोसले, व सांस्कृतिक पुनर्जागरणाचे अध्वर्यू कन्हैयालाल मुंशी या ग्रंथासाठी’ प्रसाद फाटक यांना प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यासन प्रमुख डॉ.सुनील भंडगे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्रशांत साठे यांनी केले. आभार रविंद्र शिंगणापूरकर यांनी मानले.




